भारतात असंसर्गजन्य आजारांचे वाढते संकट! काय आहे कारण?



मुंबई - भारतामध्ये असंसर्गजन्य आजारांचे वाढते प्रमाण हे सध्या सार्वजनिक आरोग्यासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब आणि श्वसनविकार यांसारखे आजार देशातील मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमुख कारण बनत असून, बदलती जीवनशैली आणि शहरीकरण यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनाच्या अहवालानुसार, भारतातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे ६३ टक्के मृत्यू असंसर्गजन्य आजारांमुळे होत आहेत. पूर्वी संसर्गजन्य रोग हे मृत्यूचे मुख्य कारण मानले जात होते. मात्र गेल्या दोन दशकांत जीवनशैलीशी संबंधित आजारांनी वेगाने वाढ घेतली आहे. विशेष म्हणजे, या आजारांचे प्रमाण आता ग्रामीण भागातही वाढताना दिसत आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या अलीकडील अभ्यासानुसार, देशात सुमारे १० कोटींहून अधिक नागरिक मधुमेहाने ग्रस्त असून जवळपास १३ कोटी लोक प्री-डायबेटिक अवस्थेत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे तरुणांमध्येही मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते ४० वर्षांखालील लोकांमध्ये जीवनशैलीजन्य आजारांचे प्रमाण पूर्वीपेक्षा दुपटीने वाढले आहे.कर्करोगाच्या रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ होत आहे. प्रदूषण, तंबाखू सेवन, अयोग्य आहार आणि मानसिक ताण ही प्रमुख कारणे असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. शहरी भागातील बैठी जीवनशैली, दीर्घ कामाचे तास आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे लठ्ठपणा वाढत असून तो अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देत आहे.


 

0/Post a Comment/Comments