पौराणिक कथांमध्ये अनेकदा अशा काही घटना सांगितल्या जातात जिथे आधीचे जग कसे होते आणि आत्ताचे जर कसे आहे यावर प्रकाश टाकला जातो. पुराणशास्त्रानुसार एखाद्या देवी किंवा देवतेच्या शापामुळे बदल झाल्याचे दाखले दिले जातात. समुद्राबद्दलही अशीच कथा सांगितली जाते समुद्राचे पाणी खारट का झाले, कोणाच्या शापामुळे समुद्राचे पाणी खारट झाले...याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
शिवपुराण काय सांगते?
पुराणांनुसार पूर्वी समुद्राचे पाणी खारट नव्हते, तर गोड, पांढरे आणि पिण्यायोग्य होते. मात्र एका शापामुळे समुद्राचे पाणी कायमचे खारट झाले. शिव पुराणानुसार भगवान शंकर यांना प्राप्त करण्यासाठी हिमालयाची सुपुत्री पार्वतीने एकदा समुद्रकिनारी कठोर तपश्चर्या सुरू केली होती. पार्वती मातेच्या तपाची चर्चा तिन्ही लोकांत सुरु होतील. त्यांच्या कठीण तपश्चर्येच्या तेजाने सगळीकडे खळबळ माजली होती.
समुद्रदेवाने व्यक्त केली इच्छा
सर्व देवी- देवता भयभीत झाल्या मात्र समुद्रदेव माता पार्वतीच्या रूपावर मोहित झाले. ते माता पार्वतीसमोर प्रकट झाले आणि त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. हे ऐकून माता पार्वती क्रोधित झाल्या नाहीत, तर त्यांनी समुद्रदेवाच्या भावनांचा आदर करत सांगितले, ‘मी भगवान शिवशंकर यांच्यावर प्रेम करते आणि त्यांच्याशीच विवाह करण्यासाठी इच्छुक आहे. त्यांच्याशिवाय मी कोणाचाही विचार करु शकत नाही.’ देवी पार्वतीने केलेल्या शिव स्तुतीमुळे समुद्रदेव मत्सर आणि क्रोधाने लाल झाले. त्यांनी रागाच्या भरात महादेवाचा अपमान केला. समुद्र देव म्हणाले, ‘ते एक भस्मधारी आहेत तर मी गुणसंपन्न आहे. मी सर्वांची तहान भागवतो आणि माझे चरित्र दुधासारखे शुभ्र आहे. हे देवी! तू माझ्याशी विवाहास होकार दे आणि समुद्राची राणी हो.’
तो शाप अन् समुद्राचे पाणी झाले खारट!
समुद्रदेवाचा अहंकारी स्वभाव आणि महादेवाच्या अपमानाने पार्वती मातेचा क्रोध अनावर झाला. शिवशंकराचा अपमान त्या सहन करु शकल्या नाहीत. त्यांनी रागाने समुद्रदेवाला शाप दिला, ‘ज्या गोड पाण्याचा तुला इतका अभिमान आणि घमेंड आहे, ते पाणी खारट होईल आणि तुझ्या समुद्राचे पाणी कोणताही मनुष्य पिणार नाही.’ असे म्हणतात की माता पार्वती यांनी दिलेल्या शापामुळे समुद्राचे पाणी खारट झाले आणि आता आपण कितीही प्रयत्न केले तरी विशाल जलस्रोताचे हे पाणी आपली तहान भागवण्यासाठी वापरता येत नाही.

Post a Comment