अहिल्यानगर - एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देऊन तिचा छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या आणि माहेरच्या अशा एकूण सात जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना संगमनेर तालुक्यातील शिदोडी येथे घडली असून, गुन्हा पुढील तपासासाठी घारगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडितेचे वडील पेत्रस बाबुराव साळवे, आई जयश्री पेत्रस साळवे, मध्यस्ती सुरेखा संतोष शिंदे (सर्व रा. मुकीदपुरा, नेवासा फाटा), सासरे रावसाहेब पुंडलिकराव गायकवाड, सासू संगिता रावसाहेब गायकवाड, दीर रवी रावसाहेब गायकवाड आणि पती गोपीनाथ रावसाहेब गायकवाड (सर्व रा. शिदोडी, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपींनी संगनमत करून तिचा विवाह गोपीनाथ गायकवाड याच्याशी लावून दिला. लग्नानंतर शिदोडी येथे सासरी असताना पती गोपीनाथ याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. पीडितेच्या सासूनेही तिला उपाशी ठेवून मानसिक व शारीरिक छळ केला. या जाचाला कंटाळून अखेर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळ घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने हा तपास आता तिकडे सोपवण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात बालविवाहाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Post a Comment