कृषी खात्याची बनावट पदवी दाखवून भामट्याने केली डॉक्टरची ११.२४ लाखांची फसवणूक

 


अहिल्यानगर - महाराष्ट्र कृषी खात्याची बनावट 'चंदन रत्न' आणि 'ड्रॅगन फ्रूट रत्न' पदवी धारण केल्याचे भासवून एका डॉक्टरची ११ लाख २४ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील संशयित आरोपी तेजस सतिष शेटे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडाळा येथील वैद्यकीय व्यावसायिक नागेश मारुती मेंगडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी तेजस शेटे याने फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्याला कृषी खात्याकडून विशेष पदवी मिळाल्याचे खोटे सांगितले. त्याने एका ब्लॉगद्वारे कृषी खात्याची बनावट माहिती दाखवून ठराविक जातीच्या चंदनाची लागवड केल्यास मोठे उत्पन्न मिळते आणि त्यास शासन मान्यतेचे प्रमाणपत्र मिळेल, असे आमिष दाखवले.  

या खोट्या आश्वासनांना बळी पडून मेंगडे यांनी चंदनाच्या रोपांसाठी वेळोवेळी ११ लाख २४ हजार ५०० रुपये आरोपी शेटे याला दिले. मात्र, त्याने चंदनाची रोपे दिली नाही तसेच पैसेही परत देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ.मेंगडे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. माहिती अधिकारात माहिती मिळवण्यास विलंब झाल्याने ही फिर्याद उशिरा दाखल झाली आहे. पोलिसांनी आरोपी शेटे याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments