अहिल्यानगर - नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका २७ वर्षीय युवतीवर कारमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून माजी महापौर अभिषेक कळमकर याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पिडीत युवतीने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पीडित युवतीची ओळख अभिषेक कळमकर याच्याशी झाली होती. युवतीने ती बेरोजगार असल्याचे सांगितल्यावर कळमकर याने तिला नोकरीसाठी मदत करण्याचे आश्वासन देत तिचा मोबाईल क्रमांक घेतला होता. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये त्याने युवतीला संपर्क साधून शोरूममध्ये काम देण्याच्या बहाण्याने बेलेश्वर मंदिर परिसरातील नगर - पाथर्डी रस्त्यावर बोलावून घेतले.
पीडिता तिथे पोहोचल्यानंतर कळमकर याने तिला स्वतःच्या कारमध्ये बसवले. नगर क्लबच्या पुढे निर्जन ठिकाणी कार उभी करून त्याने तिला पिण्यासाठी पाण्याची बाटली दिली. पाणी पिल्यानंतर पीडितेला ग्लानी आली असता, आरोपीने तिला नोकरीचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध कारमध्येच अत्याचार केला. या कृत्यानंतर त्याने पीडितेला धमकावून सोडून दिले.
काही दिवसांनी आरोपीने पुन्हा संपर्क साधून पीडितेकडे भेटीची मागणी केली. तिने नकार दिला असता, त्याने कारमधील घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच, भेटायला न आल्यास जीवे मारण्याचीही भीती घातली. सामाजिक दबावामुळे आणि भीतीपोटी पीडितेने इतके दिवस मौन पाळले होते. मात्र, आरोपीवर इतरही गुन्हे दाखल झाल्याचे समजताच पीडितेने हिंमत करून पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान कळमकर याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात २१ फेब्रुवारी रोजी शिरूर येथील एका तरुणीच्या फिर्यादी वरून अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्या पिडीत तरुणीलाही कळमकर याने अशाच प्रकारे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत अत्याचार केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून कळमकर फरार आहे. त्याचा अटकपूर्व जामीन अर्जही जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच २ दिवसांपूर्वीच त्याच्या विरुद्ध जिल्हा न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट काढलेले आहे. त्यातच आता अत्याचाराचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने कळमकर याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

Post a Comment