एसटी बस मध्ये महिलेचे २० तोळे दागिने चोरणारी महिला अखेर पोलिसांच्या जाळ्यात, २५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत


अहिल्यानगर - पुणे ते नगर एसटीबस प्रवासात करजगाव (ता. नेवासा) येथील महिलेच्या बॅगमधील २० तोळ्याचे दागिने चोरणार्‍या महिलेला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, चोरीचे सोने घेणार्‍या सराफाकडून सदरचे २० तोळ्याचे २५ लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. माया कल्याण भोसले (वय ३६, रा. हातगाव, ता. शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

मिनाबाई ज्ञानदेव बडाख (वय ५७, रा. करजगाव, सोनई) यांनी ७ एप्रिल रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या सकाळी वाकडेवाडी (पुणे) एसटी स्थानकावरून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी बसमध्ये बसल्या होत्या. त्यांच्या बॅगेत सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने ठेवलेले होते. बस घोडनदी-शिरूर परिसरात आल्यानंतर दोन अनोळखी महिला तोंडाला स्कार्फ बांधून बसमध्ये चढल्या. त्यापैकी एक महिला फिर्यादींच्या शेजारी बसली. काही वेळाने त्या महिला सुपा (ता. पारनेर) परिसरात उतरल्या. पुढे केडगाव येथे पोहोचल्यावर फिर्यादींनी बॅग तपासली असता त्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान माया कल्याण भोसले हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. चोरी केलेले सोने तिने तिच्या ओळखीच्या सराफ दुकानदार भागवत मधुकर आदापुरे (रा. बोधेगाव, ता. शेवगाव) याच्याकडे दिल्याचे उघड झाले. यानंतर संबंधित सराफ दुकानदारास पोलिसांनी नोटीस देऊन पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले असता, त्याने पंचांसमक्ष २५ लाख रूपये किंमतीचे सुमारे २० तोळ्याचे सोन्याचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलिस अंमलदार दौंड, विशाल दळवी, विनोद बोरगे, राहुल शिंदे, साबीर शेख, रोहिणी दरंदले, दीपक रोहकले, सत्यजित शिंदे, अमोल गाढे, अतुल काजळे, शिरीष तरटे, अतुल कोतकर, राहुल मासाळकर, महेश पवार, रमेश शिंदे, अतुल लाटे, कविता साठे, पल्लवी रोहकले, राहुल गुंड्डू यांच्या पथकाने केली.


 

0/Post a Comment/Comments