मुंबई - संजय दत्तचा आगामी चित्रपट ‘आखिरी सवाल’ सध्या बॉलिवूडमध्ये प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाचा नवा प्रोमो रिलीज झाल्यानंतर पुन्हा एकदा देशातील सर्वात संवेदनशील आणि वादग्रस्त विषयांपैकी एक असलेल्या अयोध्या आणि बाबरी मशीद प्रकरणावर चर्चा सुरू झाली आहे.
चित्रपटाच्या नव्या प्रोमोमध्ये थेट प्रश्न विचारला जातो “6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत नेमकं काय घडलं होतं?” बाबरी मशीद पाडण्यात आलेल्या त्या दिवसाबाबतचा हा प्रश्न आजही देशाच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील सर्वात मोठ्या वादांपैकी एक मानला जातो.
या चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) इतिहासाशी संबंधित अनेक संवेदनशील मुद्द्यांना हात घालण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या टीझरमध्ये महात्मा गांधी आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या 1934 मधील भेटीचा संदर्भ दाखवण्यात आला होता.
तसेच चित्रपटात काही गंभीर प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. महात्मा गांधी यांच्या हत्येमागे RSS चा संबंध होता का? बाबरी मशीद पाडण्यात RSS ची भूमिका काय होती? आणीबाणीच्या काळात संघाची भूमिका नेमकी काय होती? अशा अनेक प्रश्नांमुळे चित्रपटाभोवती मोठे वादळ निर्माण झाले आहे.
या चित्रपटात अभिनेत्री समीरा रेड्डी देखील पुनरागमन करत आहे. तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी केवळ सुरक्षित भूमिका करण्यासाठी परत आले नाही. या चित्रपटामुळे RSS बद्दलच्या माझ्या अनेक समजुती बदलल्या. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला जाणवलं की अनेक गोष्टी जशा दिसतात तशा प्रत्यक्षात नसतात.”
चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी केली असून कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. ‘आखिरी सवाल’ हा चित्रपट 8 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment