अहिल्यानगर - केडगाव परिसरातील नगर-पुणे महामार्गावर असलेल्या काकडे मळा भागात दोन अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री खिडकीचे गज कापून घरात प्रवेश करत रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
याबाबत रामदास शंकर काकडे (वय ४९, रा. ज्ञानेश्वर हॉटेल मागे, काकडे मळा, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा बांधकाम व्यवसाय असून ते ज्ञानेश्वर हॉटेलच्या मागे कुटुंबासह राहतात. १५ एप्रिल रोजी रात्री सर्व कुटुंब जेवण करून झोपले होते. फिर्यादी, त्यांची पत्नी आणि आई घरासमोरील भागात झोपले होते, तर मुलगा आणि मुलगी घरात झोपलेले होते. पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास मुलीला जाग आली असता, दोन अनोळखी व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून घरातील सामान चोरत असल्याचे तिच्या निदर्शनास आले.
चोरट्यांनी घराच्या किचनमधील खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला होता. घरातील बेडमधील लोखंडी कपाटाचे दरवाजे तोडून लॉकरमधील दीड तोळ्याची सोन्याची साखळी, सोन्याचे कानातील दागिने, पितळी मूर्ती आणि ४० हजार रुपयांची रोख रक्कम असा माल लंपास केला. या चोरीप्रकरणी रामदास काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भरवस्तीत झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

Post a Comment