नगर तालुक्यात महावितरणच्या तंत्रज्ञाला मारहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल


नगर तालुका (प्रतिनिधी) - वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार निवारण करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञाला लाथाबुक्कीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी येथे घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सोपान कारभारी नवसुपे (रा. मठपिंपरी, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. नवसुपे हे वाळकी येथे महावितरण कार्यालयात तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. वाळकी येथील रहिवासी आरोपी दीपक बाळासाहेब भालसिंग यांनी वीजपुरवठा बंद असल्याची तक्रार महावितरणच्या पोर्टलवर केली होती. या तक्रारीचे निवारण करण्यासाठी नवसुपे हे दीपक भालसिंग यांच्या घरी गेले होते. तेथे त्यांनी वीज मीटरची पाहणी केली असता, मीटरमध्ये 'लूज कॉन्टॅक्ट' असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यावेळी नवसुपे यांनी दीपक भालसिंग यांना "तुम्ही मीटरमध्ये छेडछाड केली आहे का?" अशी विचारणा केली. या विचारणेचा राग आल्याने आरोपी दीपक बाळासाहेब भालसिंग आणि जयेश दीपक भालसिंग या दोघांनी नवसुपे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्कीने मारहाण केली. "जर पुन्हा या गावात दिसलात, तर तुम्हाला जीवे ठार मारून टाकू," अशी धमकीही यावेळी आरोपींनी दिली. या प्रकारामुळे सरकारी कामात अडथळा निर्माण झाला असून, तंत्रज्ञ नवसुपे यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यात आले.

या घटनेनंतर सोपान नवसुपे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दीपक भालसिंग आणि जयेश भालसिंग या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार गुंजाळ हे करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments