अहिल्यानगर - तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेला माजी महापौर अभिषेक कळमकर यास तातडीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं. ३ येथे हजर होण्याचे आदेश न्यायालयाने काढले असून त्याबाबतचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. हजर न झाल्यास फरार घोषित करून संपत्ती जप्त करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कळमकर विरोधात शिरूर येथील तरुणीच्या फिर्यादी वरून फेब्रुवारी मध्ये एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. तेव्हापासून तो फरार आहे. तो मिळुन येत नसल्याने त्याचेविरुध्द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ७५ प्रमाणे स्टँडिंग वॉरंट काढण्यात आले होते. सदर स्टँडीग वॉरंट अहिल्यानगर जिल्हा, तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये पाठवुन आरोपीचा शोध घेण्यात आला परंतु तो मिळुन आला नाही. त्यानंतर आरोपीविरुध्द भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ८४ प्रमाणे कार्यवाही होणेबाबत न्यायालयास पत्रव्यवहार करण्यात आला असुन न्यायालयाने आरोपीस हजर होणेबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ८४ प्रमाणे जाहिरनामा काढुन तो सार्वजनिक ठिकाणी दर्शनिय भागामध्ये प्रसिध्द करणेबाबत आदेशीत केलेले आहेत.
न्यायालयाने दिलेल्या जाहिरनाम्यामध्ये आरोपी अभिषेक बाळासाहेब कळमकर (रा. भुतकरवाडी चौक, सावेडी) यास तात्काळ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं. ३ यांचेसमक्ष हजर होणेबाबत आदेश दिलेले असुन सदर आरोपी न्यायालयासमोर हजर न राहिल्यास त्यास फरार आरोपी म्हणुन घोषीत करण्यात येणार असलेबाबत नमुद केलेले आहे. वर नमुद गुन्ह्यातील आरोपी अभिषेक कळमकर यास न्यायालयासमक्ष हजर होणेबाबत आवाहन करण्यात येत असुन आरोपी हजर न झाल्यास त्याचे संपत्ती जप्तीची कार्यवाही करण्यात येणार आहे. असे या जाहीरनाम्यात म्हंटले आहे.

Post a Comment