नगर तालुका (प्रतिनिधी)- शेतातून रस्ता तयार करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना देहरे परिसरात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नागदेव बाजीराव पिंपळे (वय ४६, रा. काळे वस्ती, देहरे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, देहरे येथील शेत गट क्रमांक १६/६ मध्ये ही घटना घडली. फिर्यादी पिंपळे हे त्यांच्या मालकीच्या शेतातून रस्ता तयार करण्याचे काम करत होते. यावेळी त्याच परिसरात राहणारा आरोपी जयराम सुरेश आग्रे हा तिथे आला. त्याने पिंपळे यांना 'तू हा रस्ता बंद कर' असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली.
पिंपळे यांनी ही शेती माझी असून मी रस्ता करणारच असे उत्तर दिल्यावर आरोपीचा राग अनावर झाला. त्याने पिंपळे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच लाकडी दांडक्याने पिंपळे यांच्या हाताच्या कांबीवर जोरात प्रहार केला. तसेच यापुढे रस्ता केल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली.
मारहाणीत जखमी झालेल्या पिंपळे यांना उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलिसांनी जयराम आग्रे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Post a Comment