नगर तालुक्यात आगीच्या वणव्यात ९ शेतकऱ्यांची फळझाडे, शेती साहीत्य जळून भस्मसात


नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील सारोळा कासार - अकोळनेर शिवेलगत असलेल्या जांभळदरा परिसरात १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वणवा पेटून मोठी आग लागली. या आगीत परिसरातील ९ शेतकऱ्यांच्या शेतातील फळझाडे व इतर प्रकारची झाडे होरपळून निघाली, तर या शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक चे पाईप, शेततळ्याचे कागद, विहिरी, बोअरवेलच्या पाईपलाईनही जळाल्या असून या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दुपारी ३ च्या सुमारास लमाणबाबा देवस्थान पासून काही अंतरावर असलेल्या डोंगरावर अचानक वणवा पेटला. दुपारी वेळ आणि कडक उन त्यामुळे आगीने काही काळातच रौद्र रूप धारण केले. डोंगरावरून ही आग जवळच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पसरली. परिसरातील नागरिकांना आगीच्या ज्वाला व धुराचे लोट दिसू लागल्यावर नागरिकांनी तिकडे धाव घेतली. मात्र आग विझवण्यासाठी कुठलीही साधने उपलब्ध नसल्याने आणि आगीने रौद्र रूप धारण केलेले असल्याने नागरिकांना काहीच करता आले नाही.

या आगीत सुधाकर रंगनाथ धामणे यांच्या शेतातील चंदन, कडूनिंब, मलबारलिंब आदी झाडे, विशाल मधुकर धामणे, सुभाष भास्कर धामणे, विलास गंगाधर धामणे, वनाजी गंगाधर धामणे या शेतकऱ्यांच्या शेतातील चिंचेची झाडे, संजय आप्पासाहेब धामणे यांच्या शेतातील संत्र्याची बाग, ज्ञानदेव भाऊसाहेब धामणे व पोपट भाऊसाहेब धामणे यांच्या शेतातील आंब्याची बाग, राजेंद्र आप्पासाहेब धामणे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले आहे. या शिवाय या सर्व शेतकऱ्यांच्या शेतात ठिबक सिंचनाचे अंथरलेले पाईप, विहिरी, बोअरवेलच्या पाईपलाईन, शेततळ्यातील कागद व पाईपलाईन आदी शेती साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे.      

ही आग कशामुळे लागली, की कोणी लावली याची प्रशासनाने सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या परिसरात रस्त्यालगत असलेल्या हॉटेल मधून दुपारी काही जणांनी दारू घेवून ते दारू पिण्यासाठी डोंगराच्या बाजूला गेले होते. त्यातीलच कोणी सिगारेट ओढून तेथे टाकून दिली असावी किंवा मुद्दामहून आग लावली असावी अशीही शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी, तातडीने पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.   


 

0/Post a Comment/Comments