अहिल्यानगर -म्हाडामध्ये घर आणि दुकान मिळवून देतो, असे सांगून एका महिला डॉक्टरचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोवेळी ३५ लाख ३० हजार १२२ रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नगरमधील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स्वाती दीपक गायकवाड (मूळ रा. आनंद गाडे चौक, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर, हल्ली रा. ग्रामीण रुग्णालय, जामखेड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी या ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे नेत्र चिकित्सा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना संशयित आरोपी दिलीप धनराज भंडारी, धनराज भंडारी, कुसुम भंडारी, अशोक चोपडा आणि इतर (सर्व रा. सिव्हील हडको, अहिल्यानगर) यांनी म्हाडामध्ये घर आणि गाळे मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते.
या आमिषाला बळी पडून फिर्यादी यांनी त्यांना रोख स्वरूपात, ऑनलाइन आणि चेकद्वारे एकूण २६ लाख ५२ हजार रुपये दिले. ही रक्कम त्यांनी बँकेतून कर्ज काढून उभी केली होती. कर्जापोटी फिर्यादीने आतापर्यंत ८ लाख ७८ हजार १२२ रुपयांचा भरणा केला आहे. मात्र, पैसे घेऊनही गेल्या ३-४ वर्षात घर किंवा दुकान न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. संशयितांनी या रकमेचा अपहार करून फिर्यादीला शिवीगाळ व धमकीही दिली. अखेर या प्रकरणी त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी ५ जणांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करत आहेत.

Post a Comment