अहिल्यानगर - नगर शहरासह जिल्ह्यात ‘ध्येय मल्टीस्टेट’च्या शाखा सुरु करून ठेवीदारांना ज्यादा परताव्याचे आमिष दाखवत कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा करून त्या परत न देता सर्व शाखा बंद करून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल होवून तब्बल २ वर्ष होत आली आहेत. तरीही या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेला चेअरमन विशाल भागानगरे अद्यापही फरार असून तो तोफखाना पोलिसांना सापडत नाही. आता तर या गुन्ह्याचा तपासही थंडावला असल्याने ठेवीदार चिंतेत असून भागानगरे सह अन्य आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याची मागणी ठेवीदारांनी केली आहे.
‘ध्येय मल्टीस्टेट’ कडून ठेवीदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे यांनी १६ मे २०२४ रोजी नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. त्यावरून ११२ ठेवीदारांची ५ कोटी ७८ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा संस्थेचा चेअरमन विशाल भागानगरे याच्यासह ७ संचालकांच्या विरुद्ध दाखल झालेला आहे. त्यानंतर अपहाराची रक्कम आता ७ कोटी ६ लाख ३० हजारांवर पोहोचली आहे. या रकमेत अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलिसांकडून अतिशय संथ गतीने आणि आरोपींना सहाय्य होईल अशा पद्धतीने सुरु असल्याचा आरोप ठेवीदारांकडून केला जात आहे.
पोलिसांच्या या भूमिकेमुळेच २ संचालकांना अटकेपासून संरक्षण मिळालेले आहे. यातील एक आरोपी व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे याला गुन्हा दाखल झाल्यावर तब्बल ९ महिन्यांनंतर २७ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिसांनी अटक केली. मात्र आता २ वर्ष होत आले तरी मुख्य सूत्रधार आणि संस्थेचा चेअरमन विशाल भागानगरे सह इतर आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. पोलिसांना ते का सापडत नाहीत? या मागील गौडबंगाल काय? असा सवाल ठेवीदार करत आहेत. या गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने होवून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याची मागणी ठेवीदारांनी अनेकदा केली. मात्र त्यांनाही तोफखाना पोलिसांनी तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपींच्या सारखी वागणूक देत वेळोवेळी वाटे लावले आहे. त्यामुळे तोफखाना पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असून आता पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी यात लक्ष घालून ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ठेवीदार करत आहेत.
आरोपी व त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्ता जप्त कराव्यात
ठेवीदारांनी नुकतीच तोफखाना पोलिस ठाण्याचे पो.नि. जगदीश भांबळ यांची ही भेट घेत या गुन्ह्याच्या तपासाला गती द्यावी, आरोपींना तातडीने अटक करावी, आरोपी हे त्यांच्या मालमत्तांची विल्हेवाट लावत असून त्या संदर्भात संबंधित यंत्रणेशी पत्रव्यवहार करून आरोपींच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्ता जप्त कराव्यात. तसेच त्यांनी यापूर्वी त्यांच्या मालमत्ता कोणाला विकल्या याचाही तपास करावा अशी मागणी केली आहे. यावेळी फिर्यादी सुजाता नेवसे, सीताबाई सरोदे, जालिंदर पवार, बापू गायकवाड, महेश तरटे, भाऊसाहेब कासार, अरुण लबडे, स्वप्निल आगरकर आदींसह इतर ठेवीदार उपस्थित होते.

Post a Comment