शून्यामधूनी विश्व निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी
लोभ, माया, प्रीती देवूनी, सत्य-सचोटी मार्ग दावूनी
अमर जाहला तुम्ही जीवनी, आठवण येते क्षणोक्षणी..
सारोळा कासार येथील रहिवासी,रयत शिक्षण संस्थेतील निवृत्त प्राचार्य कै. श्री. भाऊसाहेब दत्तात्रय कडूस (आण्णा) आणि निवृत्त प्राथमिक शिक्षिका कै. सौ. सुमन भाऊसाहेब कडूस या आदर्श शिक्षक दाम्पत्याचे ‘प्रथम पुण्यस्मरण’ दि. १७ एप्रिल २०२६ रोजी होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाच्या आठवणींना दिलेला उजाळा...
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत, प्रचंड जिद्द, मेहनत आणि शिक्षणावरील अपार निष्ठेच्या बळावर उभा राहिलेला हा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावा असा आहे. या दाम्पत्याने शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ, गुणवत्तापूर्ण व निष्ठापूर्वक सेवा बजावत आपल्या कष्टाळूवृत्ती, प्रामाणिकपणा व सचोटीच्या बळावर समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले असंख्य विद्यार्थी आज प्रशासकीय, अभियांत्रिकी, वैद्यकीय, शैक्षणिक आणि समाजातील विविध उच्च पदांवर कार्यरत असून, उज्ज्वल व उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.
कै. श्री. भाऊसाहेब दत्तात्रय कडूस सर, म्हणजेच सर्वांच्या प्रेमाचे “आण्णा”. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत, आण्णांनी B.Sc., B.Ed., M.A., M.Ed. असे शिक्षणाचे अनेक टप्पे त्यांच्या विद्यार्थीदशेत पार केले. रयत शिक्षण संस्थेमध्ये सारोळा कासार, विसापूर, कोतूळ, वाफगाव, टाकळीभान, वाडा, काष्टी, कोळगाव, बेलवंडी अशा विविध ठिकाणी शिक्षक, पर्यवेक्षक आणि प्राचार्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय सेवा दिली. गणित विषयातील त्यांची कुशलता व अध्यापनाची हातोटी पंचक्रोशीत प्रसिद्ध होती.
कै. सौ. सुमन भाऊसाहेब कडूस या प्राथमिक शिक्षिका तर होत्याच, त्याचबरोबर त्यांनी एक आदर्श आई, कर्तव्यदक्ष गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी संस्कारांची सजीव शाळा म्हणून देखील आयुष्यात स्वतःला सिद्ध केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ममतेची ऊब, कष्टाची ताकद आणि संयमाची शांतता विलक्षणरीत्या एकवटलेली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी स्वतःचे अस्तित्व घडविले. लग्नानंतर संयुक्त कुटुंबाची जबाबदारी, २०-२५ माणसांचा मोठा परिवार, त्याचबरोबर नोकरी आणि अपत्यांचे संगोपन, ही सर्व आव्हाने त्यांनी हसत-हसत पेलली. कष्ट आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी संसार नेटकेपणाने सांभाळला. प्रत्येक अडचणीतून मार्ग काढत कुटुंबाला स्थैर्य दिले. आई म्हणून त्यांनी आपल्या तीन मुली व दोन मुलांना सुयोग्य शिक्षण तर दिलेच, त्याचबरोबर त्यांच्यावर प्रामाणिकपणा, कष्ट, शिस्त आणि माणुसकीचे संस्कार देखील रुजविले. त्यांच्या ममतेत कठोरता नव्हती, पण योग्य वेळी दिलेली दिशा आणि आधार यामुळेच मुलांचे जीवन साकार झाले.
शिक्षिका म्हणून कै. सौ. सुमन मॅडम यांची ओळख अत्यंत प्रेमळ,संयमी आणि विद्यार्थ्यांना जवळ घेणारी अशी होती. समाजाच्या विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत असणारे त्यांनी घडविलेले असंख्य विद्यार्थी, आजही त्यांच्या मायेची आठवण कृतज्ञतेने व्यक्त करतात. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांनी दिलेले संस्कार, शिकवण आणि माया आजही त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात जिवंत आहे.
कै. श्री. कडूस सरांनी फक्त शिक्षक म्हणून मर्यादित न राहता समाजकार्यातही आपले कर्तृत्व सिद्ध केले. श्रीगोंदा येथील माध्यमिक शिक्षक संघटनेला त्याकाळी सरांनी मोठे बळ दिले. कित्येक वर्षे श्रीगोंदा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. विसापूर येथील बंद पडलेल्या शाळेची सुरुवात, सारोळा कासार येथे विज्ञान शाखेचे ज्युनिअर कॉलेज उभारणे, बेलवंडी येथील शाळेची नूतन वास्तू साकारण्यासारखे मोलाचे योगदान त्यांनी दिले. माध्यमिक शालांत परीक्षेच्या एस.एस.सी. बोर्डासाठी ‘परीक्षक ते नियामक’ म्हणून मोठा काळ त्यांनी यशस्वीरीत्या काम केले. कर्मवीर जयंतीला सरांनी रयतच्या विविध शाखांमध्ये राबविलेले अनेक उपक्रम आजही त्यांचे विद्यार्थी आवर्जून नमूद करतात. जेथे जाईल तेथील सर्व शाळा व परिसरात त्यांनी वृक्षारोपणाला बळ दिले. विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले. यातून सरांच्या पर्यावरण जागरूकतेच्या दूरदृष्टीची निश्चितच कल्पना येते.
“पवित्र मजला दगडी निद्रा, दगडाची दुलई करणारी,
पवित्र मजला जळजळीत ती, भूक श्रमातून पोसवणारी…”
विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये बचतीची सवय लागावी, यासाठी ‘संचयनी’ सारख्या अल्पबचत योजना त्यांनी रयतच्या विविध शाखांमध्ये राबविल्या. विविध विषयांवरील घोषवाक्य, निबंधस्पर्धा, यांचे आयोजन मोठ्या उत्साहात विविध शाखांमध्ये केले. व्यसनमुक्ती, ध्वजदिन, स्थिरचित्रपट असे एक ना अनेक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेने, महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी त्यांचा गौरव केला. शिक्षण क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देखील सरांना मिळाला. याशिवाय वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन या अतुलनीय कामासाठी शासनाकडून ‘पर्यावरण मित्र’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले. सेवानिवृत्तीनंतर देखील बी.एड. कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून सार्वजनिक वाचनालय, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण-वृक्षसंवर्धन इत्यादी अनेक उपक्रमांमध्ये ते सक्रीय होते. जेष्ठ नागरिक संघ अहिल्यानगर यांच्याकडूनही त्यांना ‘जीवन गौरव पुरस्काराने’ सम्मानित करण्यात आले.
कै. सौ. सुमन भाऊसाहेब कडूस मॅडम व कै. श्री. भाऊसाहेब दत्तात्रय कडूस सर.....हे बहुआयामी व्यासंगी शिक्षक अनुक्रमे दि. १२ जुलै २०२४ व दि. २७ एप्रिल २०२५ रोजी आपल्यातून कायमचे हरपले. त्यांच्या पश्चात श्री. राम भाऊसाहेब कडूस (वरिष्ठ विकास अधिकारी, आरोग्य विमा), डॉ. श्याम भाऊसाहेब कडूस (शास्रज्ञ, पशुवैद्यकशास्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक) हि दोन मुले, अध्यापनामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. उज्ज्वला अनिल धामणे, सौ. मनीषा सुरेश थोरात, सौ. सीमा राजेश सोनवणे या तीन मुली, माध्यमिक स्तरावर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत तीन जावई, पशुसंवर्धन विभाग तसेच कृषी विभागामध्ये कार्यरत दोन सुना, पुतणे व विद्यार्थीदशेतील नातवंडांबरोबरच, सहा उच्चपदस्थ इंजिनियर नातवंडे असा मोठा परिवार आहे. अशा या शिस्तप्रिय,कर्तृत्ववान,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या आदर्श शिक्षक दाम्पत्याला भावपूर्ण आदरांजली.
शब्दांकन- श्री. संपतराव गुलाबराव काळे
(स्व. श्री. भाऊसाहेब कडूस सरांचे माजी विद्यार्थी तथा विद्यमान प्राचार्य कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय सारोळा कासार, ता.नगर)


Post a Comment