पारनेर - स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने कारागृहातच गळ्यावर काहीतरी धारदार वस्तूने मारून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पारनेर कारागृहाच्या बरॅक क्र. २ मध्ये १३ एप्रिल रोजी सकाळी १०.५० च्या सुमारास घडली. त्या ठिकाणी कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे तो थोडक्यात बचावला असून त्याच्यावर पारनेर पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिप भजन सिंग (वय २२, मूळ रा. फत्तेगड, जि. फिरोजपूर, पंजाब, हल्ली रा.निघोज, ता. पारनेर) असे या आरोपीचे नाव आहे.
पारनेर तालुक्यातील निघोज येथील एस.टी. बसस्थानक परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये दि. २२ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चेहरा झाकून प्रवेश केला होता. लोखंडी हत्याराच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी संकेत चंद्रशेखर वैद्य (रा. नाशिक) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी विशेष तपास पथक स्थापन करून गुन्ह्याचा तपास सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. आणि आरोपी संदिप भजन सिंग याला तपास पथकाने शिरूर येथून ताब्यात घेत अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीला २८ मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
ही कारवाई पारनेरचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी कडूस यांच्यासह पोलिस अंमलदार अमोल धामणे, कल्याण लगड, गणेश डोंगरे, सारंग वाघ, विजय जाधव, सागर साबळे, प्रकाश बोबडे आदींनी केली होती.
आरोपीची पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. तेव्हापासून आरोपी संदिप भजन सिंग हा पारनेर कारागृहातील बरॅक क्र. २ मध्ये मध्ये बंदिस्त होता. १३ एप्रिल रोजी सकाळी १०.५० च्या सुमारास तो कुठल्या तरी धारदार वस्तूने आपल्या गळ्यावर मारून घेत असल्याचे त्या बरॅक बाहेर बंदोबस्तासाठी तैनात असलेले पो.कॉ. सागर धुमाळ यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी तत्परता दाखवत आपल्या इतर सहकाऱ्यांना बोलावून घेत आरोपीला पकडले व त्यास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले. त्यामुळे तो थोडक्यात बचावला आहे. या प्रकरणी पो.कॉ. धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी संदिप भजन सिंग विरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात बीएनएस कलम २२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment