अहिल्यानगर - कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि पोलीस ठाण्याचे वारंवार हेलपाटे वाचवण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तोफखाना पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अनिल अजिनाथ गोसावी असे या लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून, या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
यातील फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बाळासाहेब गिरी करत असून, त्यांचे मदतनीस म्हणून अनिल गोसावी काम पाहत होते. गोसावी यांनी फिर्यादीला फोन करून चौकशीसाठी बोलावले होते. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि वारंवार पोलीस ठाण्यात चकरा मारायला लावू नये, या मोबदल्यात गोसावी यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेवटी ३५ हजार रुपये देण्याचे ठरले.
फिर्यादीने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागाच्या पथकाने १५ एप्रिल रोजी तोफखाना पोलीस ठाणे परिसरात सापळा लावला. तडजोडीनंतर ठरलेली ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार अनिल गोसावी यांना पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस निरीक्षक राजू आल्हाट आणि त्यांच्या पथकाने केली. आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment