नगर तालुका (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथे घरासमोर झोपलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून चोरून नेल्याची घटना ६ एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आशाबाई मच्छिंद्र सकट (वय ५३, रा. पिंपळगाव कौडा, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि त्यांचे पती घरासमोर झोपलेले होते. ६ एप्रिल रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटे त्या ठिकाणी आले. त्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील १० हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि २० हजार रुपये किमतीचा ४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा बदाम असा एकूण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने ओढून नेला.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार डावखर करत आहेत.

Post a Comment