अहिल्यानगर - वृद्ध नागरिकांना गाठून त्यांचे भविष्य सांगतो असे भासवून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना कोतवाली पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून चोरीला गेलेल्या दोन सोन्याच्या अंगठ्या हस्तगत केल्या आहेत. लुकमान सुलेमान मदारी (वय २४) व अल्ताफ हुसेन मदारी (वय २६, दोघे रा. शिरूर, जि. पुणे, हल्ली रा.निघोज, ता. पारनेर) अशी आरोपींची नावे आहेत.
या आरोपींनी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना आपले लक्ष केले होते. २८ मार्च रोजी एकाच दिवशी १ तासाच्या अंतराने शहरातील पुणे बस स्थानक तसेच केडगाव वेशीसमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर या घटना घडल्या होत्या. पहिल्या घटनेत फिर्यादी अरुण सहादु निंबाळकर (वय ७४ वर्ष) हे पुणे एसटी बसस्थानकात बसची वाट पाहत असताना, त्यांना भविष्य सांगण्याच्या बहाण्याने फसवून त्यांची सोन्याची अंगठी चोरली होती.
तर दुसऱ्या घटनेत फिर्यादी संतोष चंद्रसेन गायकवाड (वय ६८ वर्ष) हे केडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसलेले असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना गाठले. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करून, हातातील सोन्याची अंगठी २० रुपयांच्या नोटेमध्ये गुंडाळून खिशात ठेवल्याचे भासवले आणि ती लंपास केली होती.
याबाबत कोतवाली ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या १,२०,०००/- रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या (७ ग्रॅम आणि ५ ग्रॅम वजनाच्या) हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील, महिला पो.हे.कॉ. रोहिणी दरंदले, पोलिस अंमलदार राहुल शिंदे, दौंड, दिपक रोहकले, सत्यम शिंदे, सुरज कदम, सचिन लोळगे, राम हंडाळ, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment