संतप्त ग्रामस्थांनी ट्रॅक्टर आडवे लावून रस्त्यावरील वाहतूक रोखली, हे आहे महत्वाचे कारण...


नगर तालुका (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला आणि बहुतांश काम पूर्ण झालेल्या दरेमळा (सारोळा कासार, ता.नगर) रस्त्याचे अवघे १०० मीटरचे काम काही शेतकऱ्यांनी अडवल्याने हा रस्ता रखडला आहे. याबाबत तहसील कार्यालय, पोलिस प्रशासन यांना वारंवार निवेदने देवूनही तोडगा न निघाल्याने संतप्त ग्रामस्थांनी ११ एप्रिल रोजी सारोळा ते खडकी रस्त्यावर सुमारे दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. ट्रॅक्टर आडवे लावून या रस्त्यावरील वाहतूक रोखण्यात आली होती. आता २५ एप्रिल पर्यंत तोडगा न निघाल्यास पुन्हा रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सारोळा कासार शिवारात असलेला सारोळा - खडकी रस्ता ते दरेमळा या रस्त्याचे काम ७ वर्षापूर्वी तत्कालीन आमदार विजय औटी यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर केले होते. या रस्त्याचे बहुतांश काम पूर्णही झालेले आहे. मात्र सदर रस्ता खडकी रस्त्याला जोडण्यासाठीचे केवळ १०० ते १२५ मीटरचे काम काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडलेले आहे. याबाबत गाव पातळीवर अनेक बैठका झाल्या, ग्रामसभेतही अनेकदा यावर चर्चा झाली. मात्र त्यात तोडगा न निघाल्याने ग्रामपंचायतने तसेच दरेमळा येथील ग्रामस्थांनी अनेकदा तहसील कार्यालय, नगर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केलेले आहेत. मात्र त्यावर अद्यापही तोडगा काढण्यात आलेला नाही.

दरम्यानच्या काळात या रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी आ. काशिनाथ दाते यांनी पुन्हा १५ लाखांचा निधी मंजूर केलेला आहे. मात्र काम सुरु होत नसल्याने हा निधी माघारी जाण्याची वेळ आली आहे. सुमारे १ ते दीड किलोमीटरचा रस्ता मजबुतीकरण आणि डांबरी करण होवूनही गावातून येणाऱ्या सारोळा खडकी या मुख्य रस्त्याला तो जोडला गेला नसल्याने या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

त्यामुळे संतप्त नागरिकांनी आणि महिलांनी ११ एप्रिल रोजी सकाळी सारोळा खडकी रस्त्यावर आंदोलन सुरु केले. ट्रॅक्टर आडवे लावून या रस्त्यावरील वाहतूक रोखण्यात आली. या आंदोलनाची माहिती मिळताच प्रशासनाच्या वतीने ग्राम महसूल अधिकारी सुनिल ताकटे तसेच नगर तालुका पोलिसांचे पथक त्या ठिकाणी आले. ताकटे यांनी तहसीलदार यांच्या वतीने निवेदन स्वीकारत २५ एप्रिल पर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनात सरपंच आरती कडूस, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कडूस, तुकाराम ढोरे, रोहित काळे, दत्तात्रय कडूस, माजी उपसरपंच जयप्रकाश पाटील, एकनाथ कडूस, शिवाजी कडूस, ज्ञानेश्वर काळे, संजय काळे,अरुण कडूस यांच्या सह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.


 

0/Post a Comment/Comments