अहिल्यानगर(प्रतिनिधी)- नाशिकच्या सिन्नरमध्ये पार पडलेल्या ७३ व्या राज्य निवड चाचणी व अजिंक्यपद पुरुष कबड्डी स्पर्धेत अहिल्यानगरच्या संघाने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. सलग तीन वेळा हुलकावणी देणाऱ्या अजिंक्यपदाला अखेर यंदा नगरच्या वाघांनी गवसणी घातली. अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या तगड्या संघाचा ४४-३३ अशा गुणांच्या फरकाने पराभव करत अहिल्यानगरने मानाची ट्रॉफी उंचावली आहे. अहिल्यानगरच्या संघाने या स्पर्धेत पाचव्यांदा अंतिम फेरीत मजल मारून एक नवा इतिहास रचला.
सिन्नर (नाशिक) येथे २ ते ६ दरम्यान आयोजित ७३ व्या राज्य निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धेत नगरच्या संघाने साखळी सामन्यात गटातील सर्व सामने जिंगत बादफेरीत प्रवेश मिळवला होता. बादफेरीत ठाणे, रायगडला हरवून अंतिम सामन्यात धडक मारली होती. साखळी सामन्यांपासूनच संघाने आपला दरारा कायम राखला होता. बाद फेरीत ठाणे आणि रायगड सारख्या दिग्गज संघांना लोळवत नगरने अंतिम फेरीत धडक मारली.
कोल्हापूरविरुद्धच्या सामन्यात पहिल्या चढाईपासूनच नगरच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर पकड मिळवली आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या यशाबद्दल जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, प्रकाश बोरूडे, संतोष घोरपडे, विनायक भुतकर आदींनी संघाचे अभिनंदन केले आहे.
अहिल्यानगरचे हे खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार
संघाच्या या ऐतिहासिक विजयात डावी चढाईपटू आदित्य शिंदे, शिवम पटारे, उजवा कोपरा रक्षक शंकर गदई आणि डावा मध्य रक्षक अजित पवार यांनी अष्टपैलू खेळ केला. ठाण्याविरुद्ध ६०-२६ आणि रायगडविरुद्ध ५३-२७ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवून नगरने आपल्या ताकदीचे दर्शन घडवले. माजी क्रीडा अधिकारी अजय पवार आणि प्रशिक्षक शंतनू पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने हे यश संपादन केले.
या विजेत्या संघाचे अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव प्रा. शशिकांत गाडे, विजयसिंह मिस्किन, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, खजिनदार प्रकाश बोरूडे, उद्योजक संतोष घोरपडे, विनायक भुतकर, अजय पवार, सचिन सप्रे, कृष्णा लांडे आदींनी अभिनंदन केले.

Post a Comment