अहिल्यानगर - राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार अक्षय शिवाजी कर्डिले यांची जंगम व स्थावर अशी एकत्रित मालमत्ता ७ कोटी ८० लाख ७६ हजार १४२ रुपये, त्यांची पत्नी प्रियंका अक्षय कर्डिले यांच्या नावावर १ कोटी ६४ लाख ३८ हजार ६१७ रु.ची मालमत्ता आहे तर कर्डिले हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावावर जंगम व स्थावर अशी एकूण मालमत्ता १६ कोटी ३५ लाख ११ हजार ६५९ रुपयांची असल्याचे उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
उमेदवार अक्षय कर्डिले प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राहुरी मतदारसंघातील दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे ते चिरंजीव आहेत. भाजपने त्यांना अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कानंतर निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार कर्डिले यांच्या विरोधातील निवडणुकीतील चुरस जवळपास संपुष्टात आली आहे.
उमेदवार कर्डिले यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये जंगम मालमत्तेमध्ये स्वतःकडे १८ लाख २६ हजार ११४ रुपये रोख रक्कम, २ कोटी २७ लाख ५७ हजार ३८७ रुपये बँक खात्यामध्ये रक्कम तर त्यांची पत्नी प्रियंका कर्डिले यांच्याकडे स्वतःची ६ लाख १२ हजार ९ रुपये रोख रक्कम असून १ कोटी ६४ लाख ३८ हजार ६१७ रुपये बँक खात्यामधील रक्कम आहे. कर्डिले यांची स्थावर मालमत्ता ही ५ कोटी ५३ लाख १८ हजार ७५५ रुपये आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर स्थावर मालमत्ता नाही. मात्र हिंदू अविभक्त कुटुंबाकडे १९ लाख ११ हजार ९२६, जंगम तर १६ कोटी १५ लाख ९९ हजार ८३३ रूपयांची स्थावर मालमत्ता आहे.
त्याचबरोबर कर्डिले यांच्या नावावर दोन पेट्रोल पंप असून फोर्ड इंडीवर, टोयाटो फॉर्च्यूनर, बुलेट, ट्रॅक्टर, प्लेजर व मोटरसायकल अशी एकूण सहा वाहने आहेत. तर पत्नीच्या नावावर अंजना वाईन टॅक्स हे दुकान आहे. कर्डिले यांच्या नावावर मर्चन्टस् बँकेचे ३ कोटी १५ लाख ४४ हजार ५२३ रुपये, तर हिंगणगाव सोसायटीचे ७ लाख ९९ हजार ८२९ व स्टेट बँकेचे १४ लाख ९३ हजार १३३ रुपयांचे कर्ज आहे. अक्षय कर्डिले यांनी उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये शेती, दुध व्यवसाय व हॉटेल व्यवसाय असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमुद केले आहे तर पत्नीच्या उत्पन्नाचा स्त्रोतामध्ये शेती, दुध व वाईन व्यवसाय असल्याचे नमूद केले आहे.

Post a Comment