अक्षयतृतीयापासून पुन्हा अवकाळीचा मुहूर्त; १९ ते २१ एप्रिलदरम्यान पावसाचा येलो अलर्ट



अहिल्यानगर - राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेची नोंद झाली आहे. तर राज्यात आज शनिवारपासून काही ठिकाणी वादळी पावसाला पोषक वातावरण आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज आहे. नगर जिल्ह्यात देखील अक्षयतृतीयाच्या मुहूर्तापासून पुन्हा वादळी अवकाळीची शक्यता असून १९ ते २१ एप्रिलदरम्यान पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.

शुक्रवारी राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट होती. यात सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात दिवसभर उन्हाचा कडका कायम होता. वाढलेल्या उन्हामुळे राज्यात पावसाळी वातावरण तयार होण्यास मोठी मदत झाली असून आज शनिवार (दि.१८) जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, अकाला, अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. तर धाराशिव, सोलापूर, लातूर, नांदेड, हिंगोली, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

उद्या रविवार (दि.१९) विदर्भवगळता राज्यातील इतर बागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आला. तर पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, हिंगोली आणि परभणी तसेच कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

सोमवारी आणि मंगळवारीही राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज देण्यात आला. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील बहुतांशी भागात सोमवारी आणि मंगळवारी वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने अहिल्यानगर जिल्ह्यात १९ ते २१ एप्रिलदरम्यान पावसाचा येलो अर्लट दिला आहे.


 

0/Post a Comment/Comments