पाथर्डी (प्रतिनिधी) - पाथर्डी तालुक्यातील सुसरे गावात एक धक्कादायक फसवणुकीची घटना समोर आली आहे. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने एजंटमार्फत लाखो रुपये देऊन आणलेल्या नवरीने लग्नाच्या पहिल्याच रात्री सासरच्या मंडळींना मोठा ‘चुना’ लावला. पहाटेच्या सुमारास घरातील सोन्याचे दागिने आणि मोबाईल घेऊन ही नवरी पसार झाली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुसरे येथील एका तरुणाला गेल्या अनेक वर्षांपासून लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. ग्रामीण भागात लग्नासाठी मुलींचे प्रमाण कमी असल्याने अनेक तरुण हवालदिल झाले आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत काही एजंटनी या तरुणाच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि जालना जिल्ह्यातील एका मुलीसोबत लग्नाची बोलणी केली. मध्यस्थी करणाऱ्या एजंटला आणि मुलीच्या नातेवाईकांना मोठी रक्कम दिल्यानंतर लग्नाचा मार्ग मोकळा झाला.
बुधवारी, ३ एप्रिल रोजी हा विवाह सोहळा उत्साहात पार पडला. सकाळी लग्न लागल्यानंतर सायंकाळी ८ वाजता नववधू मोठ्या थाटामाटात सुसरे येथील आपल्या सासरी आली. घरात नवीन नवरीचे आगमन झाल्याने आनंदाचे वातावरण होते. गृहप्रवेश, हळदी-कुंकू आणि इतर सर्व पारंपरिक विधी उत्साहात पार पडले. संपूर्ण कुटुंब दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री गाढ झोपेत असताना, नवरीने मात्र आपला डाव साधला.
गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास जेव्हा नवरदेव आणि त्याचे नातेवाईक जागे झाले, तेव्हा त्यांना नवीन नवरी घरात कोठेही दिसली नाही. अधिक तपास केला असता, घरातील एक तोळ्याची सोन्याची पोत, नवरदेवाने स्वतःसाठी बनवलेले एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र आणि घरातील मोबाईल गायब असल्याचे निदर्शनास आले. काही तासांपूर्वीच लग्न करून आलेली नवरी घरातील किंमती ऐवज घेऊन पसार झाल्याचे लक्षात येताच कुटुंबाला मोठा धक्का बसला.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवाने नातेवाईकांसह थेट पाथर्डी पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. पीडित कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेऊन संबंधित एजंट आणि मुलीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, मध्यस्थी करणाऱ्या एजंटचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे सुसरे गावात मोठी चर्चा सुरू असून, लाखो रुपये खर्च करूनही पदरी फसवणूक आल्याने नवरदेव आणि त्याचे कुटुंब हवालदिल झाले आहे.
ग्रामीण भागात सध्या ‘पैसे देऊन मुलगी आणणे’ आणि ‘एजंटमार्फत लग्न जुळवणे’ या प्रथेचा गैरफायदा घेणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अशा प्रकारे फसवणुकीच्या घटना वारंवार घडत असल्याने तरुणांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही अनोळखी मध्यस्थावर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी सावध राहण्याचे आवाहन आता जाणकारांकडून केले जात आहे.

Post a Comment