संगमनेरातील भोंदू महाराजासह दोघांना अटक; मंत्राने आजार बरे करण्याच्या नावाखाली करायचा फसवणूक



संगमनेर (तालुका प्रतिनिधी) - संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे स्वतःला दैवी शक्ती आहे असे भासवणाऱ्या भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याच्यासह आणखी चौघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यासह दोघांना शुक्रवारी (दि.१७) रात्री अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र गडगे याने वडगावपान येथे दत्तधाम सरकार नावाचे युट्यूब चॅनल सुरू करून त्यावर कर्करोगासारखे दुर्धर आजार मंत्रशक्ती आणि दैवी शक्तीने बरे करतो, मूल नसलेल्या महिलांना मूल प्राप्त करून देतो तसेच घरातील विविध समस्या दूर करतो, असे खोटे दावे केले. या दाव्यांवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांकडून त्याने अकरा हजार, एकवीस हजार ते एकावन्न हजार रुपयांपर्यंत रक्कम उकळल्याचे समोर आले आहे.

इतकेच नव्हेतर, स्वतः मध्ये दैवी शक्ती असल्याचा आव आणून त्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. तसेच विविध आजारांवर उपचाराच्या नावाखाली पालापाचोळ्याचे औषधा देऊन त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे आकारले. या औषधांमुळे अनेकांना शारीरिक त्रास सहन करावा लागल्याची माहितीही पुढे आली आहे. गेल्या सुमारे दहा वर्षांपासून त्याने गरजू व अडचणीत सापडलेल्या लोकांचे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव तथा वकील रंजना गवांदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी राजेंद्र बापू गडगे, डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे (रा. वडगावपान, ता. संगमनेर) तसेच सुरज शिंदे व मधुकर शिंदे (रा. रहीमपूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान रात्री उशिरा राजेंद्र गडगे, मधुकर शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य तिघांचा शोध सुरु आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण साळुंखे हे करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments