बीड - बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती अचानक खालावल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने पोलिसांनी तातडीने मोठ्या बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या डॉक्टरांकडून त्याची सखोल वैद्यकीय तपासणी सुरू असून पुढील उपचारांबाबत निर्णय तपासणीनंतरच घेतला जाणार आहे. या घटनेमुळे प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रुग्णालयात नेताना वाल्मिक कराडचा बदललेला चेहराही समोर आला. दीर्घ काळ तुरुंगात राहिल्यामुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. केस पांढरे पडलेले, शरीर अशक्त झाल्याचे आणि थकवा जाणवत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या अवस्थेमुळे कराडच्या आरोग्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, रुग्णालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल होताच त्याच्या समर्थकांनीही रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली. डॉक्टरांकडून आवश्यक चाचण्या सुरू असून त्याच्या प्रकृतीची स्थिती नेमकी काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, त्याच्या तब्येतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचा जामीन अर्ज यापूर्वी अनेक वेळा न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि अगदी सर्वोच्च न्यायालयानेही त्याला दिलासा नाकारला आहे. त्यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढतच गेला आहे. या प्रकरणात सध्या न्यायालयीन सुनावणी सुरू असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.

Post a Comment