अकोळनेर डेपोतून निघालेले टँकर हॉटेलवर थांबायचे, 'एलसीबी' ने उघड केला इंधन चोरीचा गोरख धंदा



अहिल्यानगर (प्रतिनिधी) - स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी गव्हाणवाडी (ता. श्रीगोंदा) येथे एक मोठा विमान इंधन (एटीएफ) चोरीचा धंदा उघड केला आहे. रविवारी (5 एप्रिल) पहाटे पथकाने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण 88 लाख 58 हजार 770 रूपये किंमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एलसीबीचे पथक श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना माहिती मिळाली की, गव्हाणवाडी येथील हॉटेल महाराजाच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये विमान इंधनाचा अवैध साठा आहे. त्यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांना माहिती दिली. लोखंडे यांच्या उपस्थितीत पथकाने छापा टाकला असता इंडियन ऑइल कंपनीच्या टँकर (एमएच 04 एलक्यु 6865) मधून संशयित आरोपी तीन ड्रममध्ये एटीएफ इंधन काढताना पकडले. मुकेश रामअकबाल सिंग (वय 26, रा. अहियापुर, उत्तर प्रदेश), रामभवन रामतिरथ राजपूत (वय 32, रा. मु.पिप्राइसमाईल, उत्तर प्रदेश) व चंदु शिवराम जांभळकर (वय 41, रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सदर ठिकाणाहून माहिती घेतली असता संशयित आरोपींनी टँकरमधील सील तोडून Aएटीएफ इंधन चोरी करून विक्रीसाठी साठवले होते. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार हरीष भिमसिंग (रा. पिंपरी, पुणे) आणि इतर साथीदार अद्याप पसार आहेत. पथकाने घटनास्थळावरून 45 लाख 91 हजार 870 रूपये किमतीचे सुमारे 28 हजार लिटर एटीएफ इंधन, 40 लाख रूपये किंमतीचा टँकर, लोखंडी टिपाडे, इंधन काढण्याचे इंजिन, ड्रम व इतर साहित्य असा एकुण 88 लाख 58 हजार 770 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपींविरूध्द बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

इतर उद्योगांसाठी विक्री

अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर येथील तेल डेपोतून विमानाचे इंधन (एटीएफ) टँकरमध्ये भरून ते इतर जिल्ह्यातील विमानतळावर पुरवठा करण्यासाठी वाहतूक केले जाते. या वाहतुकीदरम्यान सदर टँकरमधून काही इंधन ड्रममध्ये काढून घेत ते इतर ठिकाणी विक्री करत असल्याचा उद्योग गव्हाणवाडीत सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक कबाडी यांनी सांगितले. दरम्यान, विमान इंधनाचा उपयोग इतर उद्योगासाठी केला जातो. टँकरमधून चोरून काढलेले विमान इंधन इतर ठिकाणी विक्री करण्याचा मोठा उद्योग या ठिकाणी सुरू असल्याचे समोर आले आहे.

 


0/Post a Comment/Comments