अहिल्यानगर - नगर-जामखेड रस्त्यावरील निंबोडी शिवारात असलेल्या वृंदावन मंगल कार्यालयासमोर २५ मे रोजी पहाटेच्या सुमारास एका कोळसा व्यापाऱ्याला अडवून शिवीगाळ व मारहाण करत लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विजय बंडू लालघोडे (वय ४८, रा. कुसगाव, मावळ, सध्या रा. कुर्डे, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शेती आणि कोळसा विक्रीचा व्यवसाय करतात. २५ मे रोजी पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास ते नगर-जामखेड रस्त्यावरून पिकअप गाडी मधून जात होते. यावेळी निंबोडी परिसरात वृंदावन मंगल कार्यालयासमोर आरोपी महादेव (पूर्ण नाव माहीत नाही) आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीला रस्त्यात अडवले.
आरोपींनी फिर्यादी विजय लालघोडे यांना रस्त्यावर गाठून शिवीगाळ व दमदाटी करत चापटीने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळील ५४ हजार ४७० रुपये किमतीचा २ हजार ९५ किलो तयार कोळसा, २५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकूण ९४ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिसांनी तातडीने पावले उचलली. घटनेचे गांभीर्य ओळखून तपास पथकासह श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार पुढील तपास करत आहेत.

Post a Comment