अहिल्यानगर - सावेडी येथील चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड शोरूममधून तीन अनोळखी महिला आणि एका पुरुषाने खरेदीच्या बहाण्याने येत २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सावेडी शाखेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक सुहास बाहुबली भोसेकर यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन अनोळखी महिला आणि एका पुरुषाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावेडीत अपेक्स रुग्णालयाशेजारी चंदुकाका सराफ यांचे शोरूम आहे. १२ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शोरूममध्ये तीन महिला आणि एक पुरुष ग्राहक म्हणून आले होते. त्यांनी दागिने पाहण्याच्या बहाण्याने काउंटरवरील कर्मचाऱ्याला सोन्याचे पट्टीचे शॉर्ट गंठण दाखवण्यास सांगितले. कर्मचाऱ्याने काही दागिने दाखवले, मात्र ते पसंत नसल्याचे सांगून ते सर्वजण खरेदी न करताच शोरूममधून निघून गेले. त्यानंतर काउंटरवरील दागिन्यांची मोजदाद केली असता, त्यामध्ये एक सोन्याचे मिनी गंठण कमी असल्याचे कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले.
संशय आल्याने शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यात आले. त्यामध्ये आकाशी रंगाची साडी नेसलेल्या एका महिलेने काउंटरवरील सोन्याचे मिनी गंठण अत्यंत हुशारीने उचलून स्वतःच्या साडीत लपवल्याचे स्पष्ट दिसले. चोरट्यांनी १६ ग्रॅम वजनाचे आणि २ लाख रुपये किमतीचे हॉलमार्क असलेले सोन्याचे मिनी गंठण चोरून नेले आहे. या प्रकरणी १८ मे रोजी पोलिसांनी चौघांच्या विरुद्ध बीएनएस कलम ३०५ (अ), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी करत आहेत.

Post a Comment