अहिल्यानगर - शहरातील स्वस्तिक चौकातील पुणे बस स्थानक परिसरात एका अनोळखी भामट्याने ज्येष्ठ महिलेचा विश्वास संपादन करून ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अलका सुधाकर पोळ (वय ६५, रा. रांजणी, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला कामानिमित्त पुणे येथे जाण्यासाठी बस स्थानकावर आल्या होत्या. दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास त्या बसची वाट पाहत असताना, एक अज्ञात तरुण त्यांच्या जवळ आला. त्याने महिलेला 'आई, उन्हात नका बसू, सावलीत चला' असे म्हणून विश्वासात घेतले. बसमध्ये चढताना गर्दी होईल, त्यामुळे गळ्यातील दागिने सुरक्षित ठेवण्यासाठी माझ्याकडे द्या, असे त्याने महिलेला सांगितले. भामट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून महिलेने आपले १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र काढून त्या तरुणाकडे दिले.
मंगळसूत्र हातात येताच तो तरुण गर्दीचा फायदा घेऊन तिथून पसार झाला. थोड्या वेळाने तो तरुण परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे तपास सुरू केला आहे. प्रवासादरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये आणि आपले दागिने स्वतःकडेच सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Post a Comment