अहिल्यानगरमध्ये भोंदूबाबाला अटक, घराखालील गुप्तधन काढून देण्याच्या नावाखाली घातला गंडा

 


अहिल्यानगर - नगर शहरात अंधश्रद्धेच्या नावाखाली मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. घराखालील गुप्तधन काढून देण्याच्या आमिषाने एका भोंदूबाबाने महिलेकडून ५० हजार रुपये घेवून जादूटोणा, अघोरी विद्या केल्याचे दाखवत गुप्तधनही काढून दिले नाही आणि घेतलेले पैसेही परत न देता फसवणूक केली आहे. या प्रकरणी १२ मे रोजी रात्री उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. शिव अण्णासाहेब सोनवणे (रा.रंगभवन जवळ, सर्जेपुरा) असे या भोंदूबाबाचे नाव आहे.

याबाबत सोनाली महेश काळोखे (रा.रंगभवन जवळ, सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या घराजवळच राहणारा भोंदूबाबा शिव सोनवणे याने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला तुमच्या घराखाली मोठ्या प्रमाणात सोन्याचे गुप्तधन आहे. ते जादूटोणा आणि अघोरी विद्या करून काढून देतो असे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांच्याकडून ५० हजार रुपये रोख स्वरुपात घेतले. या भोंदूबाबाच्या भूलथापांना बळी पडून फिर्यादीच्या कुटुंबीयांनी घर पाडले. त्यानंतर या भोंदू बाबाने त्या जागेत लिंबू, मानवी कवटी, हाडे, हळद, कुंकू, भस्म अशी पूजा मांडून मोठमोठ्याने मंत्र उच्चारून अघोरी विधी केला. परंतु कुठलेही गुप्तधन मिळवून न देता आणि घेतलेले ५० हजार रुपये न देता फसवणूक केली. तसेच आता ही जागा माझी आहे. तुम्ही जर माझ्या नादाला लागले तर तुमच्यावर अघोरी प्रयोग करून तुम्हाला संपवून टाकील अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.

या फिर्यादी वरून पोलिसांनी भोंदूबाबा शिव अण्णासाहेब सोनवणे याच्या विरुद्ध बीएनएस कलम ३१८ (), ३५१ () सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक जगदीश भांबळ आणि गुन्हे शोध पथकाने भोंदूबाबा शिव सोनवणे याला रात्रीच अटक केली आहे.   

जागा बळकावण्यासाठी कुटुंबाला बेदम मारहाण

दरम्यान भोंदू बाबा शिव सोनवणे याने गुप्तधनाच्या आमिषाने काळोखे कुटुंबाला घर पाडायला लावले. त्यांची आर्थिक फसवणूक केली. तसेच जागा बळकावण्यासाठी कुटुंबीयांना ११ मे रोजी रात्री १०.३० च्या सुमारास लाथाबुक्क्यांनी आणि कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाणही केली आहे. या मारहाण प्रकरणी आणखी एक गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महेश भास्कर काळोखे (वय २९, रा. रंगभवन, सर्जेपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात शिव अण्णासाहेब सोनवणे, ओम अण्णासाहेब सोनवणे, कोहिनूर अण्णासाहेब सोनवणे (सर्व रा. सर्जेपुरा) आणि यश सागर सोळशे (रा. बोल्हेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिव सोनवणे आणि इतर आरोपींनी फिर्यादी महेश काळोखे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी आलेला भाऊ दीपक आणि आई लक्ष्मी यांनाही आरोपींनी कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करत जखमी केले. तसेच त्यांच्या दुचाकीचेही नुकसान करून जीवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादी वरून शिव सोनवणे सह चौघांवर मारहाणीचा व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे


 

0/Post a Comment/Comments