कर्जत (प्रतिनिधी) - कर्जत शहरातील हॉटेल गौरव येथे काम करणाऱ्या २० वर्षीय वेटरचा मारहाण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना २७ मे रोजी पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास घडली. समीर अकबर शेख (वय २०, रा. जामगाव, ता. आष्टी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलमधील कामाच्या कारणावरून झालेल्या वादातून समीर शेख याच्यावर तिघांनी हल्ला केला. आरोपींनी त्याचे डोके लोखंडी वस्तूवर आपटून गंभीर जखमी केले आणि नंतर काळ्या रंगाच्या कपड्याने गळा आवळून त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी हे उत्तर प्रदेशातील असून त्यांची नावे राज हरिनाम गुप्ता (वय १८ वर्षे ३ महिने), दुखरन तिरथराज गौतम (वय १९) आणि मनोज मसुदिलाल गौतम (वय २४) अशी आहेत. घटनेनंतर ते पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, मृत समीर शेख याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली असून त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही तपास सुरू आहे. खुना मागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment