नगर - विधानपरिषदेची अहिल्यानगरची जागा अखेर भाजपसाठी सोडण्यात आली असून, या जागेवरुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे उमेदवार असतील. तनपुरे यांचा शनिवारी (दि.३० मे) मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. यावेळी त्यांची उमेदवारीही जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती तनपुरे यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
विधानपरिषदेच्या अहिल्यानगरच्या जागेवरुन गेल्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरु होती. जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक २०७ नगरसेवक असल्यामुळे भाजपाने या जागेवर हक्क सांगितला होता. तर दुसरीकडे मागील विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे ही जागा होती. या जागेवर स्व. अरुणकाका जगताप हे निवडून आले होते. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीकडेच ठेवून या जागेवर स्व. अरुणकाका यांचे सुपूत्र सचिन जगताप यांना उमेदवारी द्यावी, अशी राष्ट्रवादीची मागणी होती. त्यासाठी आ. संग्राम जगताप हे देखील आग्रही होते. राष्ट्रवादी ही जागा सोडायला तयार नव्हते तर भाजप ही जागा स्वतःकडे घेण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यामुळे महायुतीतील इतर सर्व जागांचे वाटप होऊनही अहिल्यानगरच्या जागेचा तिढा सुटला नव्हता.
पक्षश्रेष्ठींच्या वारंवार बैठका झाल्यानंतर अखेर २९ मे रोजी अहिल्यानगरच्या जागेचा तिढा सुटला. यात भाजपने ही जागा आपल्याकडे घेवून माजी मंत्री तनपुरे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा केला आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या विनंतीला मान देवून तनपुरे यांनी उमेदवारी केली नव्हती. त्यामुळे भाजपाचे आ. अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला होता. विधानसभेची परतफेड विधानपरिषदेला करु, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार आता तनपुरे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. तनपुरे हे ३० मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करतील आणि १ जून रोजी आपला उमेदवारी अर्ज भरतील, असे भाजपमधील सुत्रांनी सांगितले.
दरम्यान अहिल्यानगरची जागा भाजपकडे गेल्याने आ. संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आम्ही दोन दिवस मुंबईत होतो. सर्व वरिष्ठांना भेटलो आहे. त्यांच्याशी आम्ही सविस्तरपणे बोललो आहे. अजून दोन दिवस आहेत. आमची सर्वप्रकारे तयारी आहे, असे ते म्हणाले.
काँग्रेसकडून करण ससाणे यांना एबी फॉर्म
काँग्रेसकडून श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. मात्र, ससाणे हे निवडणूक लढवण्यास इच्छूक नाहीत. वरिष्ठ पातळीवर त्यांची मनधरणी सुरु आहे, असे काँग्रेसमधील सुत्रांनी सांगितले. अजून दोन दिवस शिल्लक आहेत. ऐनवेळी ससाणे यांच्या जागेवर दुसरा उमेदवारही दिसू शकतो, असे सांगण्यात आले.

Post a Comment