अहिल्यानगर - शहरातील सिव्हील हॉस्पिटल आवारात असलेल्या जिल्हा प्रशिक्षण केंद्रात अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे गज तोडून आत प्रवेश करत कार्यालयातील मौल्यवान इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर साहित्य असा एकूण २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या घटनेमुळे शासकीय कार्यालयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री संभा शिंदे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शासकीय सुट्टी असल्यामुळे १५ मे च्या संध्याकाळपासून १८ मे च्या सकाळपर्यंत कार्यालय बंद होते. सकाळी कर्मचारी योगेंद्र पालवे कार्यालयात आले असता, त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचे आणि वातानुकूलित यंत्र (एसी) सुरू असल्याचे आढळले. संशय आल्याने त्यांनी तात्काळ डॉ. शिंदे यांना माहिती दिली.
पोलिसांच्या मदतीने आत प्रवेश केला असता, कार्यालयातील कपाटे उघडी आणि साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी मागील खिडकीची भिंत तोडून आणि लोखंडी गज मोकळे करून आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी कार्यालयातून १ ॲम्प्लीफायर, २ प्रोजेक्टर, ३ कॉम्प्युटर साऊंड सिस्टीम, ३ गिझर, १ डीव्हीडी प्लेअर, २ माईक स्टँड, व्हिडिओ कॅमेरा, फोटो कॅमेरा आणि ६० फूट केबल वायर चोरून नेली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. या चोरीचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील आंधळे करत आहेत.

Post a Comment