अहिल्यानगर - कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. 'ऑपरेशन मुस्कान' अंतर्गत कोतवाली पोलिसांनी पुण्याच्या वानवडी परिसरात सलग ३६ तास तपास करत मुलीची सुटका केली आणि संशयित आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी प्रदीप उर्फ व्हन्या परशुराम इजगत (रा. रेल्वे स्टेशन, बोहरी चाळ, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध पीडितेच्या पालकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी आणि मुलगी बेपत्ता होते. पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते.
दरम्यान, आरोपी हा मुलीसह पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून बसल्याची गोपनीय माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली. त्यांनी तातडीने तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल श्वेता परमासागर, पोलीस कॉन्स्टेबल याकूब सय्यद आणि अमोल गाडे यांचे विशेष पथक तयार करून पुण्यात रवाना केले.
पुण्यात पोहोचलेल्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. सलग ३६ तास पाळत ठेवून पोलिसांनी अखेर आरोपी प्रदीप इजगत याला ताब्यात घेतले आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली. पोलिसांनी आरोपीला अहिल्यानगर येथे आणून गुन्ह्यात अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, उपनिरीक्षक प्रवीण पाटील, श्वेता परमासागर, याकूब सय्यद, अमोल गाडे, राहुल गुंडू आणि नितीन शिंदे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत.

Post a Comment