अहिल्यानगर - अवघ्या चार दिवसात पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या दरात ९१ पैशांनी तर डिझेलच्या दर ९४ पैशांनी वाढ करण्यात आली आहेत. त्यामुळे नगर मध्ये पेट्रोलचा दर थेट १०७.९७ तर डिझेलचा भाव प्रति लिटर ९४.५२ रुपयांच्या घरात पोहोचला आहे. तसेच डिझेलच्या विक्रीवरही कंपन्यांनी पंपचालकांना मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे एका व्यक्तीला एका वेळेस २०० लिटर डिझेल देता येणार आहे.
यापूर्वी १५ मे रोजी पेट्रोलच्या दरात ३ रुपये आणि डिझेलच्या दरात ३.११ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्याला चार दिवस उलटत नाही तोच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. १९ मे रोजी सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. अवघ्या चार दिवसांत पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच केंद्र सरकारने यापैकी काही भार सर्वसामान्यांवर टाकायचे ठरवले असून त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ होताना दिसत आहे. अवघ्या चार दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. आगामी काळात खनिज तेलाचे दर वाढून पेट्रोलियम कंपन्यांचा तोटा कायम राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान पेट्रोलियम कंपन्यांनी पंपचालकांना एका वेळी एका व्यक्तीला २०० लिटर डिझेल विक्री करण्याच्या मर्यादा घातल्या आहेत. २०० लिटर पेक्षा जास्त डिझेल एकावेळी दिले तर पंप आपोआप लॉक होत आहे. त्यामुळे विविध कंपन्या, पोकलेन, जेसीबी सारखे मशिनरी व्यावसायिक यांची डोकेदुखी वाढली आहे. पंपचालकांना कंपन्यांच्या डेपो मधून पेट्रोल डिझेल पुरवठा उशिराने होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद ठेवावे लागत असल्याचे चित्र नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात दिसू लागले आहे.

Post a Comment