रेल्वे स्थानकात प्रवाशांची लुटमार, दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या


दौंड - रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाइल चोरी करणाऱ्या चोरट्यांना अवघ्या दोन तासांत अटक करण्यात आली असल्याची माहिती दौंड रेल्वेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी दिली. याप्रकरणी सचिन भोसले (रा. बोरीबेल, ता. दौंड), विजय काळे (रा बेलवंडी. ता. श्रीगोंदा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

दौंड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर २८ परप्रांतीय मजूर ग्वालियर एक्स्प्रेसने मध्यरात्रीच्या सुमारास दौंडला उतरले. सकाळी त्यांना पुणे येथे जायचे होते. परिणामी, गाढ झोपेत असलेल्या या परप्रांतीय मजुरांपैकी ८ प्रवाशांचे मोबाइल चोरून चोरटे फरार झाले. त्यानंतर पोलिसांना घटना कळतात दौंड रेल्वे पोलिस आणि गुन्हे अन्वेषण शाखा, आरपीएफ गुप्तचर शाखा यांनी एकत्रितपणे तपासाची सूत्रे फिरविले. सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांमार्फत माहिती घेतली आणि दोन तासांत गुन्हेगारांचा शोध लावून त्यांच्याकडून पाच मोबाइल ताब्यात घेतले.

ही कारवाई पुणे जिल्हा लोहमार्ग पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे, अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार, सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक हिमालय जोशी, उमेश कोंडे, प्रियांका खरात, आकाश चव्हाण, शुभम बांगर, मंगेश शेळके, दयानंद शरणार्थी, आनंद वाघमारे, धनंजय वीर तसेच आरपीएफ क्राईम ब्रँचचे एकनाथ गडदे, रामनाथ केकाण, धनंजय यादव या पोलिस पथकाने केली.


 

 

0/Post a Comment/Comments