पारनेर मध्ये भोंदूगिरीचा किळसवाणा अन संतापजनक प्रकार उघडकीस, काय काय घडलं...


पारनेर (प्रतिनिधी) - पारनेर शहरात काळुबाई देवीच्या पूजेच्या नावाखाली एका शेतकरी महिलेची तब्बल ६ लाख ५९ हजार ६८४ रुपयांची आर्थिक फसवणूक करून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मतीमंद मुलगा बरा होईल, भावाचे लग्न जमेल, घरातील संकटे दूर होतील, असे आमिष दाखवत तिला अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढण्यात आले. यानंतर देवी रागावली तर मुलाचा जीव जाईल अशी भीती घालत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात राजू बन्सी दिवटे, त्याचा मुलगा शशिकांत राजू दिवटे ( दोघेही रा. रुई छत्रपती, ता. पारनेर )आणि त्यांची सहकारी शोभा अविनाश तरटे ( रा. बाबुर्डी, ता. पारनेर )यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला ही ४० वर्षीय शेतकरी असून ती पती आणि दोन मुलांसह राहत आहे. तिचा लहान मुलगा मतीमंद असल्याने अनेक दवाखान्यांत उपचार करूनही फरक पडत नव्हता. दुसरीकडे तिच्या भावाचे वय वाढूनही लग्न जमत नसल्याने संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली होते.याच काळात कोणीतरी महिलेला रुई छत्रपती येथील राजू दिवटे आणि त्याचा मुलगा शशिकांत दिवटे यांच्याबाबत माहिती दिली. हे लोक देवलशीअसून त्यांना भविष्य कळते, घरातील अडचणींवर उपाय सांगतात, तसेच देवीच्या पूजेद्वारे समस्या दूर करतात, असे महिलेला सांगण्यात आले. त्यानंतर २०२० पासून महिला मुलगा आणि भावाला घेऊन आरोपींकडे जाऊ लागली.

महिलेने आरोपींना मुलाचा मतीमंदपणा आणि भावाचे लग्न जमत नसल्याची माहिती दिल्यानंतर आरोपींनी तुमच्यावर मांढरदेव येथील काळुबाई देवीची बाधा आहे असे सांगितले. ही बाधा दूर करण्यासाठी विशेष पूजा, होम-हवन आणि तंत्र-मंत्र करावे लागतील, असे सांगण्यात आले.यासाठी आरोपींनी महिलेला मोठी यादी दिली. त्यामध्ये विविध झाडांची लाकडे, तूप, काळा दोरा, नारळ, जवस, उडीद, काळे तीळ, लिंबू, बाहुल्या आदी वस्तूंचा समावेश होता. मुलगा बरा करण्यासाठी सलग वर्षभर पूजा करावी लागेल आणि त्यासाठी तीन ते चार लाख रुपये खर्च येईल, तर भावाचे लग्न जमवण्यासाठी दीड लाख रुपये लागतील, असे आरोपींनी सांगितले.

महिलेने साहित्य कुठून आणायचे, असा प्रश्न विचारल्यावर आरोपींची सहकारी शोभा तरटे हिने सर्व वस्तू माझ्याकडेच आहेत असे सांगून सुरुवातीलाच १० हजार रुपये घेतले.त्यानंतर चौधरी कॉम्प्लेक्स, पारनेर येथील आरोपींच्या निवासस्थानी काळुबाईच्या फोटोसमोर होम-हवन करण्यात आले. महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपी मंत्रोच्चार करत विविध वस्तू आगीत टाकत होते. पूजा झाल्यानंतर यामुळे फरक पडेल असे सांगून अंगारा दिला जात होता. तो अंगारा पाण्यात मिसळून पिण्यास सांगण्यात आले होते. या प्रकारामुळे महिला पूर्णपणे आरोपींच्या प्रभावाखाली गेली होती.

महिला दर आठवड्याला आरोपींकडे जात होती. जानेवारी २०२५ ते मार्च २०२६ या काळात पूजा, होम-हवन आणि विविध धार्मिक विधींच्या नावाखाली तिच्याकडून २ लाख ५६ हजार ६८४ रुपये उकळण्यात आले. ही रक्कम  पारनेर येथील कॉम्प्युटर सेंटर येथून ऑनलाईन पद्धतीने आरोपींना पाठवण्यात आली होती. याशिवाय एप्रिल २०२६ मध्ये आणखी २ लाख रुपये रोख घेण्यात आले. दुसरीकडे महिलेच्या भावाकडूनही पूजा आणि लग्न जुळवून आणण्याच्या नावाखाली सुमारे ९३ हजार ५३० रुपये ऑनलाईन स्वरूपात घेतले गेले. त्यानंतर आणखी १ लाख रुपये रोख उकळल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे ही सर्व रक्कम पीडित महिला आणि तिच्या भावाने विविध बँकांकडून कर्ज काढून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यानंतर चौधरी कॉम्प्लेक्समधील फ्लॅटमध्ये नेऊन तुझ्या मुलाचा आजार पूर्णपणे बरा व्हायचा असेल, त्याच्या आयुष्यासाठी तुला माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवावे लागतील असे आरोपीने सांगितले. महिलेने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्या मुलाचा फोटो दाखवत मी काळुबाईची पूजा करून त्याचे तुकडे तुकडे करीन, देवी त्याला मारून टाकेल अशी भीषण धमकी दिल्याचा आरोप आहे. मुलाच्या जीवाच्या भीतीने महिला मानसिकदृष्ट्या कोलमडली आणि आरोपीच्या दबावाखाली गेल्याचे तिने सांगितले. यानंतर आरोपी तिला वेळोवेळी फ्लॅटवर बोलावत असे. तेथे तिला तीर्थम्हणून रंगीत पाणी आणि अंगारा दिला जात होता. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले जात असल्याचा आरोप आहे. जानेवारी २०२५ ते १ मार्च २०२६ या काळात सुमारे ८ ते १० वेळा अत्याचार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पैसे परत मागितल्यावर मारहाण व धमक्या

पूजा करूनही मुलाच्या प्रकृतीत किंवा भावाच्या लग्नाबाबत कोणताही फरक पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने आरोपींकडे पैसे परत मागितले. मात्र आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली आणि तक्रार केली तर समाजात बदनाम करू, सासरी कोणी ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महिलेच्या भावालाही तुझा फोटो काळुबाईकडे नेऊन एका रात्रीत संपवून टाकीन अशी धमकी देण्यात आली होती. त्यामुळे भीतीपोटी दोघांनीही दीर्घकाळ तक्रार केली नव्हती.अखेर महिलेला आपण मोठ्या फसवणुकीचा बळी ठरलो असल्याचे लक्षात आले. तिने हा सर्व प्रकार आपल्या सासू-सासऱ्यांना सांगितला. त्यांनी तिला धीर देत पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर महिलेने पारनेर पोलिस ठाण्यात सविस्तर फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(), ६४()(एम), ११५(), ३५२, ३५१(), () तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ मधील कलम ३() आणि ३() अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे

 


0/Post a Comment/Comments