नगर तालुका (प्रतिनिधी) - शेतात काम करत असलेल्या महिलेला दोघा चोरट्यांनी मारहाण करत त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून पळवून नेल्याची घटना नगर तालुक्यातील सोनेवाडी (चास) शिवारात २० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नगर परिसरातील अशा प्रकारची महिनाभरातील ही तिसरी घटना आहे.
याबाबत विजय आसाराम लोणकर (वय ४९, रा.सोनेवाडी, ता.नगर) यांनी फिर्याद दिली आहे. सोनेवाडी शिवारात फिर्यादी लोणकर यांचे शेत आहे. २० मे रोजी दुपारी १२ च्या सुमारास फिर्यादी यांची पत्नी मनिषा शेतात काम करत होती. त्यावेळी दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आल्या. या दोघांनी अचानक मनिषा यांच्या वर हल्ला चढवला, तसेच त्यांच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र आणि कानातील सोन्याची कर्णफुले असा एकूण ७५ हजार रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने ओरबाडून नेला. दागिने लुटल्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले. ही घटना मनिषा यांनी त्यांच्या पतीला कळविली. त्यानंतर विजय लोणकर यांनी पोलिसांना माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, उपनिरीक्षक भरत धुमाळ यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी २ अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धुमाळ हे करत आहेत.
शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण
विशेष म्हणजे महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. २० एप्रिल रोजी चिचोंडी पाटील शिवारातही अशीच घटना घडली होती. ताराबाई मुरलीधर कोकाटे (वय ६५, रा.चिचोंडी पाटील, ता.नगर) या व त्यांची सून शेतात काम करत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी या दोघींना लाकडी काठीने मारहाण करत त्यांचे अंगावरील दागिने पळविले होते. शहरातील नालेगाव भागातील वारुळाचा मारुती परिसरात ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास शेतात काम करणाऱ्या सौ.सुनंदा संतोष वामन (वय ३९, रा. वारुळाचा मारुती, नालेगाव) यांना ३ चोरट्यांनी अशाच प्रकारे मारहाण करत त्यांचे दागिने हिसकावून नेले होते.
नगर शहर परिसरात घडणाऱ्या चेन स्नॅचिंग सारख्या घटना आता ग्रामीण भागातही घडू लागल्या आहेत. भरदिवसा अशा लुटमारीच्या घटना होऊ लागल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. असे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

Post a Comment