नेवासा - नेवासा तालुक्यातील खरवंडी येथे झालेल्या भीषण ट्रॅक्टर अपघातात सोनई येथील दोन अल्पवयीन सख्ख्या भावांसह त्यांच्या मामाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्यानं अभिषेक, विजय आणि त्यांचे मामा रामेश्वर मराठे हे तिघेही ट्रॅक्टरखाली दबले गेले. एका क्षणात दोन कुटुंबांचा आधार हिरावून नेणाऱ्या या घटनेनं सोनई व खरवंडी गावांवर शोककळा पसरली आहे.
सोनई येथील दत्तनगर परिसरातील प्रगतशील शेतकरी व दुग्ध व्यवसायिक गणेश दरंदले यांची मुले अभिषेक गणेश दरंदले (वय 16) व विजय गणेश दरंदले (वय 14) यांना शाळेला सुट्टी लागल्यानं ते बुधवारी (दि.२७) सकाळी खरवंडी येथे आपल्या मामा रामेश्वर बाळासाहेब मराठे यांच्याकडे गेले होते. दिवसभर आनंदात गेलेला हा क्षण सायंकाळी मात्र काळाने हिरावून घेतला. सायंकाळच्या सुमारास खरवंडी परिसरात ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. भरधाव ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्यानं अभिषेक, विजय आणि त्यांचे मामा रामेश्वर मराठे हे तिघेही ट्रॅक्टरखाली दबले गेले.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रयत्नांनी ट्रॅक्टर सरळ करून तिघांना बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली. नेवासा येथे शवविच्छेदनानंतर सायंकाळी रामेश्वर मराठे यांच्यावर खरवंडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिषेक व विजय या दोन्ही भावांवर सोनई येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गावातील वातावरण सुन्न झालं होतं.
त्यामुळे या भीषण दुर्घटनेनं दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिषेक व विजय हे प्रगतशील शेतकरी अर्जुन पाटील दरंदले यांचे नातू तसेच माजी पंचायत समिती सदस्य अण्णासाहेब दरंदले यांच्या कुटुंबातील होते. तर रामेश्वर मराठे हे बाळासाहेब मराठे यांचे एकुलते एक पुत्र होते. दुसरीकडे गणेश दरंदले यांनाही अभिषेक व विजय हीच दोन मुलं होती. त्यामुळे या भीषण दुर्घटनेनं दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सोनई आणि खरवंडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोकमय वातावरण निर्माण झालं आहे.

Post a Comment