सुनेत्रा पवार यांनी देशाच्या राजकीय इतिहासात प्रस्थापित केला नवा विक्रम


पुणे - बारामती मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. बारामतीमध्ये दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या होत्या. सुनेत्रा पवार २ लाख १८ हजार ९३० मतांनी विजयी झाल्या आहेत. यासोबतच सुनेत्रा पवार यांनी देशाच्या इतिहासातील नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय पहिल्यापासूनच निश्चित मानला जात होता. मात्र, लीड किती मिळणार हे पाहणे महत्त्वाचे होते. सुनेत्रा पवार यांना विक्रमी २ लाख १८ हजार ९३० मताधिक्क्य मिळालेले आहे. स्व. अजित पवार यांना मिळालेल्या मतांपेक्षाही सुनेत्रा पवार यांना जास्त मते मिळाली आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचा पराभव करताना १ लाख ६५ हजार मतांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. हा आतापर्यंतचा राज्यातील सर्वोच्च विक्रम होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी स्व.अजित पवारांचा रेकॉर्ड' मोडीत काढला आहे.

देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा राष्ट्रीय विक्रम

आतापर्यंत देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा राष्ट्रीय विक्रम उत्तर प्रदेशातील साहिबाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कुमार शर्मा यांच्या नावावर होता. त्यांनी २०२२ च्या निवडणुकीत २ लाख १४ हजार ८३५ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. मात्र, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी २ लाख १८ हजार ९३० मतांची आघाडी घेत शर्मा यांचा राष्ट्रीय विक्रम मागे टाकला आहे. यासह सुनेत्रा पवार आता देशातील सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या पहिल्या लोकप्रतिनिधी ठरल्या आहेत.

सुनेत्रा पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

मतमोजणी सुरु असतानाच सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना आपण सर्वांनी आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वास मी आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते. आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भावूक आहोत.

दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नयेत किंवा गुलाल उधळू नये. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसं वर्तन करूया. “दादांच्या स्वप्नातील बारामती घडवण्याची संधी मला दिल्याबद्दल मी सर्व बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानते. हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची!”


 

0/Post a Comment/Comments