नगर तालुक्यात भेसळयुक्त कांदा बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, कृषी विभागाची मोठी कारवाई...

 


नगर तालुका (प्रतिनिधी) - उन्हाळी कांदा लागवडीसाठी वापरण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये खरिपी कांदा बियाण्यांची भेसळ करून बनावट बियाणे विक्री केल्याचा प्रकार नगर तालुक्यात उघड झाला आहे. या बनावट बियाण्यांमुळे देहरे आणि शिंगवे नाईक येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, कृषी विभागाच्या पाहणी अहवालात शंभर टक्के नुकसान झाल्याचे मान्य करण्यात आले आहे. या प्रकरणी बियाणे कंपनीच्या संचालकासह कृषी सेवा केंद्र चालकावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कृषी अधिकारी तथा बीज निरीक्षक बाळासाहेब रामचंद्र कांबळे यांनी २० मे रोजी फिर्याद दिली आहे. देहरे येथील आदर्श संतोष भगत यांनी पाच एकर, तर शिंगवे नाईक येथील बाळासाहेब विठ्ठल जाधव यांनी तीन एकर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. यासाठी त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील पाडळी शिंदे (ता. देऊळगाव राजा) येथील ‘यमुनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी’च्या बियाण्यांची शिंगवे नाईक येथील श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र येथून खरेदी केली होती.

लागवडीनंतर सुमारे दोन महिन्यांनी कांद्याला डेंगळे येणे, जोड कांदा तयार होणे, कांदा न पोसणे तसेच पातीची वाढ खुंटल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. याबाबत संबंधित विक्रेत्याला माहिती देऊन शेतकऱ्यांनी ७ एप्रिल २०२६ रोजी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली.

यानंतर तालुका कृषी अधिकारी, महाबीजचे प्रतिनिधी आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शेतात प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत सदोष बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचा अहवाल देण्यात आला. मात्र, त्यानंतरही संबंधित कंपनी किंवा विक्रेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कांदा पिकासाठी केलेला संपूर्ण खर्च वाया गेला असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यात अशाच प्रकारे बनावट कांदा बियाण्यांमुळे नुकसान झाल्यानंतर कृषी विभागाने संबंधित कंपनी आणि विक्री प्रतिनिधींवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, नगर तालुक्यात शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान स्पष्ट झाल्यानंतरही कृषी विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. त्यानंतर २० मे रोजी कृषी अधिकारी कांबळे यांच्या फिर्यादी नुसार पोलिसांनी यमुनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचा संचालक सुरज शिवानंद शिंदे व शिंगवे नाईक येथील श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र चालक निखील गोविंद पाटील या दोघांच्या विरुद्ध फसवणुकीसह बीज अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.


0/Post a Comment/Comments