या पुढे बायोपिक केला तर अजित पवारांवरच करेन, दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा मानस



मुंबई : धर्मवीर आणि धर्मवीर २ या आनंद दिघे यांच्यावरील चरित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या प्रवीण तरडे यांनी या पुढे चरित्रपट करायचाच झाला तर तो राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच करेन, असा निर्धार बोलताना व्यक्त केला. तरडे यांना आत्तापर्यंत चरित्रपट तयार करण्यासाठी अनेक मोठमोठ्या नेत्यांनी तसेच, त्यांच्या समर्थकांनी ऑफर दिल्या होत्या. मात्र त्या सगळ्यांना आपण नम्रपणे नकार दिल्याचेही त्यांनी सांगितले.

बड्या राजकीय नेत्यांनी संपर्क साधला

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील ‘धर्मवीर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केलेच, सोबतच या सिनेमांच्या पार्श्वभूमीत महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली उलथा-पालथ अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. या अभूतपूर्व यशानंतर, दिग्दर्शक प्रवीण तरडे सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत यशस्वी आणि ‘मोस्ट वॉन्टेड’ दिग्दर्शक ठरला आहे. त्यामुळे आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर, ‘बॉस’वर किंवा पुढाऱ्यावर चित्रपट केला जावा, यासाठी अनेक बड्या राजकीय नेत्यांनी तरडेशी संपर्क साधला आहे, हे स्वतः प्रवीणनेच मान्य केले. अनेक पुढाऱ्यांनी कोऱ्या चेकपासून ते अफाट बजेटपर्यंतच्या ऑफर दिल्या आहेत. मात्र, हे प्रस्ताव नम्रपणे फेटाळून लावल्याचे तरडे याने सांगितले.

बायोपिक केला तर अजित दादांवर

याविषयी बोलताना प्रवीण तरडे सांगतो, ‘‘मुळशी पॅटर्न’नंतर माझ्याकडे अनेक ऑफर आल्या. अनेकांना असे वाटायचे की, आता आपल्याकडे पैसा आहे, नाव आहे, त्यामुळे कुणावरही सिनेमा करायला मी तयार होईन. पण मी खूप ऑफर परत पाठवल्या. ‘आमच्यावर सिनेमा करा’, ‘आमच्या नेत्याची कथा सांगा’, अशा कितीतरी मागण्या आल्या. पण मी प्रत्येक वेळी स्वतःला एकच प्रश्न विचारला; ‘मी हे मनापासून करू शकतो का?’

आनंद दिघेसाहेबांवर सिनेमा केल्यानंतर मला वाटले होते की, आता यापुढे कुणावर चरित्रपट करायचा नाही. कारण, तो विषय माझ्यासाठी केवळ सिनेमा नव्हता, ती एक भावनिक जबाबदारी होती. त्यामुळे त्यानंतर कुणावरही तसेच काम करणे सोपे नव्हते. पण, जर कधी मला पुन्हा एखादी बायोपिक करावीशी वाटली, तर ती अजितदादांवर असेल. कारण, अजितदादांना मी जवळून पाहिले आहे. त्यांची काम करण्याची पद्धत अनुभवली आहे.’ विशेष म्हणजे अजित पवार यांनी 'आपल्यावर बायोपिक आला, तर डॉ निलेश साबळे यांनी प्रमुख भूमिका साकारावी' असा मानस बोलून दाखवला होता.

मंत्रालयाच्या पायऱ्याही म्हणत असतील...

"सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करणारा मंत्री मी दादांच्या रूपात पाहिलाय. मंत्रालयाच्या पायऱ्यांनाही कदाचित त्यांच्या पावलांची सवय झाली असेल. आजही त्या पायऱ्या म्हणत असतील की, सकाळी सकाळी धावत येणारी ती पावलं कुठे गेली ? इतकी कामाशी नाळ जोडलेली माणसं फार कमी पाहायला मिळतात. त्यांच्या आयुष्यातला संघर्ष, वेग, दबाव आणि कामाचा ध्यास हा सिनेमाचा विषय होऊ शकतो, असे मला प्रामाणिकपणे वाटते." अशा भावना प्रवीण तरडे यांनी व्यक्त केल्या.


 

0/Post a Comment/Comments