पश्चिम बंगालमध्ये तब्बल १५ वर्षांनी सत्तांतर; भाजपाचे कमळ फुलले, तर तृणमूलचा मोठा पराभव



कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये तब्बल १५ वर्षांनी सत्तांतर घडत आहे. गेल्या निवडणुकीतही भाजपनं बंगालमध्ये प्रचंड ताकद लावली होती. तृणमूल काँग्रेसच्या अनेक आमदारांनी कमळ हाती घेतलं होतं. पण ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं भाजपला ७७ जागांवर रोखलं. तर ममता यांच्या पक्षानं तब्बल २१५ जागा जिंकल्या. पण ५ वर्षांत बंगालमधील चित्र बदललं आहे. राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत भाजपाने २९३ पैकी १९३ जागांवर निर्णायक आघाडी घेतली. तर ममता यांच्या तृणमूल काँग्रेसने ९४ व इतरांना ६ जागा मिळाल्या आहेत.   

ममतांऐवजी अभिषेक बॅनर्जी टार्गेटवर

गेल्या निवडणुकीत भाजपनं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट लक्ष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका सभेत 'दीदी ओ दीदी' म्हणत ममता बॅनर्जी यांच्यावर शा‍ब्दिक हल्ला चढवला. मुरब्बी नेत्या असलेल्या ममता बॅनर्जी याचा अचूक फायदा घेत व्हिक्टिम कार्ड वापरलं. त्यावेळी ममता बॅनर्जी यांना प्रचारादरम्यान दुखापत झाली होती. ममता बॅनर्जी यांनी व्हिलचेअरवरुन प्रचार करत बंगाली अस्मितेचा मुद्दा प्रखरपणे लावून धरला. ममता बॅनर्जी यांच्यावरील वैयक्तिक हल्ले भाजपला महागात पडले.

मागील वेळी केलेल्या चुकांमधून बोध घेत यंदा भाजपनं ममता बॅनर्जींना लक्ष्य करणं टाळलं. त्याऐवजी ममता बॅनर्जी यांचे पुतणे असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांना रडारवर घेत 'भाईपो राज'चा मुद्दा उपस्थित केला. भाईपो राजचा अर्थ पुतण्याचं राज्य, पुतण्याचं वर्चस्व असा होतो. ममता बॅनर्जींना व्हिक्टिम कार्ड खेळता येऊ नये याची काळजी भाजपनं घेतली. त्याऐवजी भाजपनं घराणेशाहीचा मुद्दा लावून धरला. ममता बॅनर्जी यांचा महिला मतदारांकडून सहानुभूती मिळणार नाही, याची दक्षता भाजपकडून घेण्यात आली.

बंगाली अस्मितेला लोकल कार्डनं उत्तर

२०२१ मध्ये भाजपनं प्रचारासाठी नेत्यांची फौज उतरवली. त्यात दिल्लीसह बाहेरील नेत्यांचा भरणा होता. मध्य प्रदेश भाजपचे प्रमुख नेते कैलास विजयवर्गीय यांच्यासह दिल्लीतील नेते प्रचार करत होते. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी ही निवडणूक स्थानिक विरुद्ध बाहेरचे अशी केली. तसाच प्रचार केला.

पाच वर्षांपूर्वी केलेली चूक भाजपनं टाळली आणि सुवेंदु अधिकारी, सुकांता मुजुमदार, दिलीप घोष यांना प्रचारात प्रमुख स्थान दिलं. हे सगळे नेते बंगाली आहेत. बंगालशी जवळचं नातं असलेल्या स्मृती इराणी यांच्यासारख्या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. त्या मूळच्या बंगाली आहेत. त्यांनी बंगाली भाषेत मतदारांशी संवाद साधला. भाजपवर बसलेला बाहेरचा पक्ष हा शिक्का पुसून टाकण्यात मोदी-शहांना यश आलं.

 


0/Post a Comment/Comments