आजोबावर गोळीबार करणाऱ्या नातवाला पोलिसांनी गावठी कट्टयासह केले जेरबंद


 

अहिल्यानगर - भाऊबंदकीच्या वादातून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याच्या रागातून आजोबावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करून पसार झालेल्या नातवाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुळा धरण परिसरात पकडले आहे. प्रवीण बाबासाहेब कोहकडे (रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) असे आरोपीचे नाव असून त्याच्या कडून गावठी कट्टयासह २ लाख ४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपी प्रवीण याने त्याचे आजोबा दगडु गंगाराम कोहकडे (रा. मोमीन आखाडा, ता. राहुरी) यांच्यावर २९ मे रोजी सकाळी ६ च्या सुमारास त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्टयातुन गोळीबार करुन पळुन गेला होता.  दगडू कोहकडे नेहमीप्रमाणे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास बाळेश्वर डोंगर परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहकडे हा दुचाकीवरून तेथे आला. तू माझ्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत, असे म्हणत त्याने दगडू कोहकडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.

दोघांतील वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने दगडू कोहकडे यांच्या छातीवर अगदी जवळून गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. गोळी लागताच दगडू कोहकडे जमिनीवर कोसळले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनेनंतर नातेवाईकांनी दगडू कोहकडे यांना तातडीने अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून त्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली

याबाबत गुन्हा दाखल होताच स्थानिक शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला. तो बारागांव नांदुर ते मुळा डॅम परिसरामध्ये संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला पकडले. त्याच्या कडून गावठी कट्टा, ४ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त केला आहे.

 


0/Post a Comment/Comments