श्रीरामपूर - माहेरी एकटीच गेली, तसेच धोंडा खायला बोलावले नाही म्हणून वकील पत्नीला शिवीगाळ करत लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत व्यावसायाने वकील असलेल्या कावेरी अभिजित शिंगोटे (रा. जुने काळभैरव मंदिराजवळ, कसबापेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दि. २५ मे रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्या माहेरी, श्रीरामपूर येथील पूर्णवाद पथ, मुळा प्रवरा जवळ वॉर्ड क्र. ७ श्रीरामपूर येथे असताना पती अभिजित शिंगोटे यांनी मोबाईलवर संपर्क साधला. तू माहेरी एकटी का गेलीस, मला धोंडा खायला का बोलावले नाही, असा जाब विचारत त्यांनी शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यानंतर पती अभिजित शिंगोटे, सासू मंदा शिंगोटे व भाया अतुल शिंगोटे हे माहेरी आले. त्यावेळी वाद वाढल्यानंतर अभिजित शिंगोटे यांनी घरासमोर पडलेला लाकडी दांडा उचलून फिर्यादीच्या उजव्या पायावर व डोक्यावर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वाद सोडविण्यासाठी फिर्यादीची आई व शेजारी धावून आले असता, अतुल शिंगोटे यांनी शिवीगाळ करत तू नांदायला येऊ नको, आलीस तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच मुलगा व मुलीला जबरदस्तीने घेऊन गेल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी अभिजित शंकरराव शिंगोटे, मंदा शंकरराव शिंगोटे व अतुल शंकरराव शिंगोटे (सर्व रा. पाचेगाव, ता. नेवासा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment