तामिळनाडूच्या राजकारणात चमत्कार, अभिनेता थलपती विजय यांचा पक्ष एक नंबरला!



चेन्नई : काही घटना या चमत्कारिक असतात. त्यामुळे प्रत्येकाला या घटनांचं आश्चर्य आणि अप्रूप वाटत असतं. महाराष्ट्रात एक अभिनेता मुख्यमंत्री होऊ शकतो का? असा प्रश्न विचारला तर निश्चितच नाही असं उत्तर येईल. पण तामिळनाडूत या गोष्टी अपवाद आहे. इथे सिनेमातले 'हिरो' हे नागरिकांच्या खऱ्या आयुष्यातही 'हिरो' बनताना दिसतात. हे हिरो केवळ चित्रपटांपुरते मर्यादीत राहत नाहीत. त्यांना आपल्या भाषेप्रती, आपल्या राज्याप्रती आणि आपल्या नागरिकांप्रती इतकं प्रेम आणि जिव्हाळा असतो की, त्यांनी निवडणूक लढवली तरी जनता त्यांना भरघोस प्रतिसाद देवून निवडून आणू शकते. मग समोर कितीही मोठे आणि जुने पक्ष असले तरी जनतेचा कौल अभिनेत्याच्या बाजूने जाऊ शकतो. थलपती विजय हा त्याचा जिवंत उदाहरण आहे.

अभिनेता थलपती विजय याचा तामिळनाडूत जलवा बघायला मिळत आहे. थलपती विजय याला तामिळनाडूच्या जनतेने भरभरुन मतदान केलं आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीत थलपती विजय याचा TVK पक्ष सर्वात जास्त आघाडीवर दिसत आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी DMK पक्ष हा थेट तीन नंबरवर गेला आहे. तर AIADMK पक्ष सध्या दुसऱ्या क्रमांकावर आघाडीवर आहे. DMK आणि AIADMK हे पक्ष अनेक वर्षांपासून तामिळनाडूत आहेत. दोन्ही पक्षांची अनेकदा तामिळनाडूत आलटूनपालटून सत्तादेखील राहिलेली आहे. पण या दोन्ही पक्षांच्या वर्चस्वाला थलपती विजयने जोरदार धक्का दिला आहे. विजयने तामिळनाडूत करुन दाखवलं आहे.

विजयचा टीव्हीके पक्ष हा 150 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर दिसत आहे. त्यामुळे विजय हा मुख्यमंत्री होतो का? ते पाहणं औत्सुक्याचं आहे. या निवडणुकीत थलपती विजय या पक्ष जिंकल्यास एक नवा इतिहास रचला जाणार आहे. स्वतःचा पक्ष स्थापित करून तामिळनाडूत सत्तेत येणारा तो पहिला अभिनेता ठरणार आहे. याआधीचे अभिनेते सत्तेत आले ते आधीपासूनच असलेल्या पक्षांच्या बळावर आलेले बघायला मिळाले आहेत.

तामिळनाडूचा आतापर्यंत निकाल काय?

आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार, तामिळनाडूत टीव्हीके पक्ष 160 जागांवर आघाडीवर आहे. तर DMK पक्ष 31 जागांवर आघाडीवर आहे. AIADMK पक्ष 21 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 2 जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर 6 जागांवर आघाडीवर आहेत.

तामिळनाडूचा राजकीय इतिहास काय?

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल यावेळी नवा इतिहास रचताना दिसत आहे. तामिळनाडूत नेहमीत प्रादेशिक पक्षांची ताकद राहिलेली आहे. इथे सुरुवातीला काँग्रेस पक्षाची सत्ता होती. त्यावेळी के. कामराज हे काँग्रेसचे प्रमुख नेते होते. पण कालांतराने म्हणजेच 1950 ते 1960 च्या काळात इथे द्रविड चळवळ उदयास आली. द्रविड आंदोलनामुळे राज्यात मोठे बदल झाले. याच आंदोलनातू पुढे दोन पक्ष तयार झाले. यामध्ये एक DMK तर दुसरा AIADMK पक्ष.

1967 मध्ये DMK पक्षाने काँग्रेसचा पराभव केला. यानंतर पुढे 1972 मध्ये अभिनेते एम जी रामचंद्रन यांनी AIADMK पक्षाची स्थापना केली. ते पुढे मुख्यमंत्री देखील बनले. यानंतर जयललिता यांचा काळ आला. तामिळनाडूचे राजकारण हे अनेक वर्ष DMK आणि AIADMK याच्याभोवती फिरताना दिसलं. सध्या तिथे DMK पक्षाचे नेते एम के स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. पण ही निवडणूक DMK आणि AIADMK यांच्यासाठी जास्त कठीण ठरताना दिसत आहे. कारण अभिनेता थलपती विजय याचा टीव्हीके पक्ष हा सर्वाधिक जागांवर आघाडीवर दिसत आहे.


 

0/Post a Comment/Comments