पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुणे न्यायालयाने त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. न्यायालयाने मुदतवाढीचा अर्ज फेटाळून लवांडे यांचे संरक्षण काढून घेतल्याने वाघोली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणामुळे राजकीय आणि वारकरी वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
वारकरी संप्रदायात घुसखोरी होत असल्याचा दावा विकास लवांडे यांनी केल्याचा आरोप होता. या वक्तव्याविरोधात नलिनी आशिष वायाळ (वय 41, रा. येरवडा) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर लवांडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाने यापूर्वी 20 मेपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसेच तपास अधिकारी, सरकार पक्ष आणि वाघोली पोलिसांना याबाबत भूमिका मांडण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
दरम्यान, तपासादरम्यान विकास लवांडे यांनी अटकपूर्व जामिनाच्या अर्जात स्वतःविरोधातील पूर्वी दाखल असलेल्या 4 गुन्ह्यांची माहिती लपविल्याचे समोर आले. सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी न्यायालयात यावर जोरदार आक्षेप घेत लवांडे यांचे संरक्षण रद्द करण्याची मागणी केली. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करत लवांडे यांना अटक केली.
दरम्यान, 9 मे रोजी लोणी काळभोर परिसरातील म्हातोबाची आळंदी येथे विकास लवांडे यांच्यावर शाईफेक आणि पिस्तूल दाखवून धमकावल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह एकूण 14 जणांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता लवांडे यांच्या अटकेमुळे हे संपूर्ण प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चोर सोडून संन्याशाला फाशी - विकास लवांडे
अटकेच्या आधी विकास लवांडे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी पोलिस चोर सोडून संन्याशाला फाशी, या म्हणीचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, पुणे पोलिसांची चोर सोडून संन्याशाला फाशी.. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत.

Post a Comment