नगर - पुणे महामार्गावर अपघातात झालेल्या नुकसान भरपाई साठी चक्क कार पळवून नेली

 


अहिल्यानगर - नगर ते पुणे महामार्गावर चास गावच्या शिवारात अपघाताच्या कारणावरून झालेल्या वादात टोळक्याने फिर्यादीच्या नातेवाईकांना धक्काबुक्की करत वाहन बळजबरीने पळवून नेल्याची  घटना ३१ मी रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात किशोर ब्राम्हणे आणि अमोल ब्राम्हणे (दोघे रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांच्यासह काही अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत किरण बाळासाहेब शेटे (वय ३०, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. चास गावच्या शिवारामध्ये असणाऱ्या दुर्वा हॉटेलच्या शेजारी आणि भारत पेट्रोल पंपाच्या जवळ हा प्रकार घडला. फिर्यादी किरण शेटे यांच्या वाहनाला आरोपीने आपल्या ताब्यातील वाहन हलगर्जीपणे आणि भरधाव वेगात चालवून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर आरोपींनी आपल्या गाडीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई फिर्यादी यांच्याकडे मागितली. परंतु, फिर्यादी यांनी ही नुकसान भरपाई देण्यास नकार दिला.

याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपी किशोर ब्राम्हणे, अमोल ब्राम्हणे आणि त्यांच्यासोबत असलेल्या अज्ञात लोकांनी फिर्यादी यांच्या नातेवाईकांना रस्त्यात अडवले. आरोपींनी नातेवाईकांना शिवीगाळ करत जोरदार धक्काबुक्की केली आणि त्यांना जबरदस्तीने धमकावले. यानंतर अपघातातील गाडी फिर्यादीच्या नातेवाईकांच्या ताब्यातून बळजबरीने टोईंग करून आरोपी अज्ञात ठिकाणी पळवून घेऊन गेले. याबाबत शेटे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार खंडेराव शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments