ChatGPT चा वापर करून बनवले नेत्यांचे बनावट लेटरहेडवर शुभेच्छा पत्रे; बड्डे बॉय आला गोत्यात


 
संगमनेर - स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चक्क पंतप्रधान आणि महाराष्ट्रातील बड्या नेत्यांच्या अधिकृत लेटरहेडचा वापर करून बनावट शुभेच्छापत्र तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात विश्वजित विजय धुळगंड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी विश्वजित विजय धुळगंड (वय २४, रा. मांडवे बुद्रुक, ता. संगमनेर) याने आपला वाढदिवस साजरा करताना सोशल मीडियाचा गैरवापर केला. आरोपीने ChatGPT या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा (AI) वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाचे अधिकृत लेटरहेड तयार केले. या बनावट लेटरहेड्सवर संबंधित मान्यवरांच्या खोट्या सह्या आणि राष्ट्रीय चिन्हाचा वापर करून त्याने शुभेच्छापत्रे तयार केली.

नागरिकांची दिशाभूल

हे शुभेच्छापत्र प्रत्यक्षात संबंधित मान्यवरांनी दिलेले नसतानाही, ते खरे आणि अधिकृत असल्याचा खोटा आभास त्याने निर्माण केला. हे बनावट शुभेच्छापत्र त्याने स्वतःच्या 'v.dhulgand' या इंस्टाग्राम अकाउंटवरून सोशल मीडियावर प्रसारित केले. या कृत्यामुळे नागरिकांची दिशाभूल होऊन त्यांची फसवणूक झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

पोलीस कारवाई

या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात पो.कॉ. प्रमोद गाडेकर यांच्या फिर्यादी वरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३६(२), ३४०(२), ३१९(२) तसेच चिन्हे व नावे (अनुचित वापर प्रतिबंध) अधिनियम १९५० च्या कलम ३ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि थोरात या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


 

0/Post a Comment/Comments